लहान मुलाला दात येत असताना काय काळजी घ्यावी? | पुढारी

लहान मुलाला दात येत असताना काय काळजी घ्यावी?

डॉ. निखिल देशमुख

मूल चार महिन्यांचे असताना त्याला दात येण्यास सुरुवात होते. दात येण्याची प्रक्रिया लहान मुलांकरिता वेदनामय असते. त्यामुळे दात येत असताना अनेक मुले सतत रडत असतात. काही मुलांना दात येताना तापही येतो. लहान मुलांना दात येत असताना वेदना होत असतील, तर त्यावर खालील घरगुती उपायांद्वारे उपचार करता येऊ शकतात. ( Children Teeth )

संबंधित बातम्या 

मुलांना दात येत असताना सतत काहीतरी चावण्याची इच्छा होत असते. त्यामुळे या काळात त्यांना त्यांची खेळणी चावण्यासाठी दिली पाहिजेत. खेळणी वा अन्य वस्तू चावल्यामुळे दात उगवताना होणार्‍या वेदना कमी होतात. मुलांना चावण्याकरिता विशिष्ट रिंग बाजारात मिळतात. त्याचबरोबर जुन्या कपड्यांचे बोळे करूनही ते मुलांना चावण्यासाठी द्यावेत.

मुलाला खूपच वेदना होऊ लागल्या आणि तो रडू लागला, तर दात येऊ लागलेल्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज करा. या हलक्या मसाजमुळे तुमच्या मुलाच्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

अ‍ॅरोरुटपासून तयार केलेले खाद्यपदार्थ दात येणार्‍या मुलांना उपयुक्त ठरतात. यामुळे मुलाच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

दात येत असताना हिरड्यांमध्ये बॅक्टेरिया तयार होण्याची शक्यता असते. काही वेळा या बॅक्टेरियामुळे इन्फेक्शनही होऊ शकते. त्यामुळे आपल्या मुलाच्या हिरड्या दररोज स्वच्छ कापडाने साफ करा.

हे उपाय करूनही वेदना थांबल्या नाहीत, तर डॉक्टरांकडून औषधोपचार घेणे भाग पडते. लहान मुलांकरिता वेदनाशामक औषधे दिली जातात. डॉक्टरांना न विचारता कोणतेही औषध परस्पर देऊ नका.

दात येण्याच्या काळात बाळाला शक्तिवर्धक पूरक आहार मिळणे गरजेचे असते. त्याच्या आहारात कॅल्शियमयुक्त नैसर्गिक अन्नपदार्थ, योग्य प्रमाणात चरबी, ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त हिरव्या पालेभाज्या, पिवळ्या व केशरी रंगाची फळे यांचा समावेश हवा. मूल दोन वर्षांचे झाल्यावर रोज दोन वेळा बेबी ब्रशने दात घासावेत. ( Children Teeth )

Back to top button