Navratri 2023 Khandenavmi : शिवकालीन शस्त्रास्त्रे ! | पुढारी

Navratri 2023 Khandenavmi : शिवकालीन शस्त्रास्त्रे !

संदीप सावंत

खंडेनवमी निमित्त देशभरात शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्यानिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रांबाबत विशेष लेख.

देवांविरुद्ध राक्षसांचे घनघोर युद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले. दहाव्या दिवशी पार्वती देवीचा विजय होऊन काशीमध्ये प्रवेश झाला. तोच आश्विन शुद्ध दशमीचा दिवस. याच दिवशी शमी वृक्षाची पूजा करून घरातील कर्त्या पुरुषाकडून आपट्याची पाने वाहून शस्त्रांचे विधिवत पूजन केले जाते. ( Navratri 2023 Khandenavmi )

वशिष्ठ धनुर्वेदात दगड, काठी, मुसळ, पाश, शिंगे याने लढणे प्रचलित होते. त्यास शिलाकाल म्हटले गेले विश्वामित्रांच्या काळात तलवार, भाला, नारसिंहळ (कट्यार), सांग, गदा, माडू, धनुष्यबाण ही शस्त्रे प्रचलित झाली. मुघल काळात वक्र पात्याच्या व साध्या मुठीच्या पर्शियन किरच किंवा किलीन तलवारी भारतात तयार होऊ लागल्या. त्यास ‘इंडो पर्शियन’ म्हणतात.

डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, अबिसियन यांनी आणलेली पाती व भारतीय मुठी यापासून भाला प्राचीन काळापासून शिकार व युद्धासाठी वापरले. तलवारी बनू लागल्या. त्यास ‘अँग्लो इंडियन’ म्हणतात. भारतात वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या तलवारी तयार होत असत. त्या-त्या भागातील नैसर्गिक वैशिष्ट्यांचा, परंपरांचा व कलाकारांचा प्रभाव बनावटीत दिसून आला. ओडिशाचा खांडा, मराठ्यांची धोप, पंजाबी तेगा, कुर्ग तलवारी होत्या, ती या भागात प्रभावी शस्त्रे होती.

खांडा

खांडा सरळ, उंच व दुधारी असे. खांड्यास घुमावदार पकड असणारी, मुल्हेरी मूठ असे. मजबुतीच्या दृष्टीने खांड्याच्या मागील पानावर दुहेरी नक्षीचे पाते चढविले जात असे. त्यामुळे खांडा वजनदार व भारी असे.

धोप

हातातील जोर सामर्थ्याने प्रकट करणारी तलवार म्हणजे धोप. मराठ्यांचे सर्वात आवडीचे शस्त्र. धोप तलवार सरळ पात्याची सुळसुळीत, लवचिक असलेली प्रामुख्याने घोडदळाचे मुख्य शस्त्र होते. धोपेचे पाते नखापासून पुतळ्यांमधून गजामध्ये जोडले जात असे. त्यामुळे मजबुती जास्त होती. बोटाच्या संरक्षणासाठी परज असल्याने शत्रूचा वार सरकून खाली आला तरी इजा करीत नसे. पात्यावरती नाळ असल्याने पाठ कठीण असे. लांबूनच वार करून शत्रूला जायबंदी करण्यासाठी धोपेची लांबी ४० ते ५० इंचांपर्यंत ठेवली जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुळजा भवानी व जगदंबा नावाच्या तिन्ही तलवारी धोप पद्धतीच्या होत्या.

पट्टा

संस्कृतमध्ये पट्ट या शब्दाचा अर्थ सरळ असा होतो. पालथ्या हातामध्ये ठिकठाक बसेल, अशा पोलादी आवरणात सरळ दुधारी लवचिक पाते बसविले जात असे. त्यास पट्टा असे संबोधले गेले. मुरारबाजी, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, रामजी पांगेरा या मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार म्हणजे पट्टा. छत्रपती शिवरायांच्या पट्ट्याचे नाव ‘यशवंत’ होते.

ढाल

संरक्षणासाठी प्रभावीपणे वापरलेले शस्त्र म्हणजे ढाल होय. शरीरकवच, हलकेपणा, चिवटपणा हे ढालीचे गुण आहेत. ढाली म्हैस, हरण, बारसिंगा, गेंडा, हत्ती, उंट यांचे कातडे कमावून बनविल्या जात.

विटा

मुक्तामुक्त प्रकारातील भाल्याच्या जातकुळातील एक शस्त्र म्हणजे ‘विटा’. शिवकालात मराठ्यांनी लांबूनच शत्रू मारण्यासाठी एक अस्त्र शोधून काढले. त्यास ‘विटा’ संबोधले गेले.

भाला

प्रासंगिक जाणारे शस्त्र म्हणजे ‘भाला’. अश्वकुंत- घोडदळातील भाले, गजकुंत- हत्तीस्वारांचा भाला, पदातीकुंत- पायदळातील भाला, असे तीन प्रकार आहेत.

गुरज

गुर्ज गुरज म्हणजे गदा, भारत खंडातील लोक यास गदा म्हणतात. तलवारीच्या मुठीत पोलादी गज बसवून पुढे कुन्हाडीप्रमाणे पाते लावलेली गदा बसविली जाते. त्यास गुरज म्हणतात. शरीराचा कठीण भाग, ढाल, चिलखत फोडण्यासाठी हे शस्त्र वापरत असत.

वाघनखे

वाघनखे हे खऱ्या अर्थाने एक गुप्त किंवा छुपे शस्त्र आहे. सभासद बखर व जेधे शकावलीत छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला मारण्यासाठी या शस्त्राचा वापर केला. वाघाच्या नखांसारखी अणुकुचीदार पोलादी पाती, पोलादी पट्टीवर बसवून वरच्या बाजूस अंगठीच्या आकाराच्या दोन कड्या बसविल्या जातात.

माडू

काळविटाच्या शिंगास अणुकुचीदार पोलादी फाळ बसवून मध्यभागी लहानशी ढाल अशी रचना असलेले शस्त्र म्हणजे माडू होय. दाक्षिणात्य लोकांनी या शस्त्राचा वापर जास्त प्रमाणात केला. माडूचे हात करताना परजण्यासाठी अग्रभागी असलेल्या टोकांचा वापर केला जातो. ( Navratri 2023 Khandenavmi )

– संदीप सावंत, (शिवकालीन शस्त्रसंग्राहक आणि अभ्यासक, कोल्हापूर )

Back to top button