पोटनिवडणूक आणि देशाची निवडणूक हा फरक पुणेकर जाणतात : मुरलीधर मोहोळ

पोटनिवडणूक आणि देशाची निवडणूक हा फरक पुणेकर जाणतात : मुरलीधर मोहोळ

पुणे : विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. सुज्ञ पुणेकर हा फरक जाणतात. देशाला स्थिर सरकार देणारे खंबीर नेतृत्व कोणत्या पक्षाकडे आहे, आर्थिक विकास कोण करेल, परकीय गुंतवणूक आणून त्यातून रोजगारनिर्मिती कोण करू शकेल, याचा विचार देशाच्या निवडणुकीत पुणेकर करतात. या सर्व प्रश्नांंची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या दहा वर्षांच्या दमदार कारकिर्दीतून मिळाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना निवडून देण्याचा निर्णय पुणेकरांनी घेतला आहे, असा दावा महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी केला. मध्यमवर्गीय, गरिबांसाठी राबण्याचा माझा मनोदय आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. 'पुढारी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

मुलाखतीचा सारांश :

कसब्याच्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचा दावा विरोधक करत आहेत. त्याकडे कसे पाहता?

– भाजपा-एनडीएची गेल्या दहा वर्षांतील कामगिरी देशासमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व क्षेत्रांत देशाचा कारभार उत्तम चालविला. देशाला स्थिर सरकार दिले. दहशतवाद मोडून काढला. परकीय गुंतवणूक वाढली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाची प्रतिष्ठा वाढली. राष्ट्रहिताचे निर्णय केले. याउलट, विरोधी आघाडीत किती पक्ष आहेत आणि त्यांचे नेतृत्व कोण करणार, हेच अजून मतदारांना समजलेले नाही. पुणेकर अतिशय सुज्ञ आहेत. राज्यपातळीवरची विधानसभा पोटनिवडणूक आणि देशपातळीवरची लोकसभा निवडणूक यात पुणेकर गल्लत करीत नाहीत. म्हणूनच 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कसब्यातील जाणत्या मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाला मत देण्याचा निर्धार केला आहे. कसब्यासह वडगावशेरी, कोथरूड, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि पर्वतीमधील सुज्ञ पुणेकरांनीही भाजपालाच मताधिक्य देण्याचे ठरविले आहे. प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणार्‍या प्रतिसादावरून मी हे आत्मविश्वासाने सांगू शकतो.

खासदार म्हणून निवडून आल्यावर अजेंडा काय असेल?

– मध्यमवर्गीय, गरीब मतदार हा पुण्याच्या सामाजिक व्यवस्थेचा कणा आहे. मीदेखील याच सामान्य वर्गातून आलो आहे. पुण्यातील माझ्या मध्यमवर्गीय, गरीब मतदारांसाठी स्वस्तातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणार आहे. आधुनिक औषधोपचार आणि दर्जेदार वैद्यकीय व्यवस्था पुणेकरांना परवडणार्‍या दरात मिळतील, याची काळजी मी घेणार आहे. 'प्रधानमंत्री आवास योजने'तून सामान्य पुणेकरांना स्वतःची, हक्काची घरे मिळवून देण्याला माझे प्राधान्य असेल. पिण्याचे पाणी घरोघर पोहोचविण्यावर माझा भर असेल. रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर पूर्ण झाले पाहिजे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. आपल्या पुण्याचे सुखद पर्यावरण, सुंदर टेकड्या, आपली नदी यांचे संवर्धन झाले पाहिजे. कचरा व सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया, सांडपाण्याचा पुनर्वापर याकडेही लक्ष देणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news