पुढारी ऑनलाईन डेस्क : आधुनिक जीवनशैलीत मानवाला अनेक सुविधा उपलब्ध झाल्या मात्र त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक आजारही वाढले आहेत. आजच्या स्पर्धेच्या युगात नैराश्य बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जगभरात ३.८ टक्के लोक नैराश्याने ग्रस्त आहेत. यावरुन तुम्हाला या समस्येचे गांर्भीय लक्षात येईल. दरवर्षी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जातो. तर जागतिक स्तरावर वाढत्या मानसिक आजारांबद्दल जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने १० ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घेवून नैराश्य टाळण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम कोणता याविषयी…
संबंधित बातम्या :
नैराश्य कसे टाळावे याविषयी अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, ताणतणाव किंवा नैराश्याने ग्रासलेल्या लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी अँटीडिप्रेसस वापरण्यापेक्षा नियमित धावणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. अॅमस्टरडॅममधील व्रिज युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की, धावणे ही तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवल्याने केवळ नैराश्याच्या रुग्णांच्या लक्षणांवरच फायदा होऊ शकत नाही; परंतु जर तुम्ही याला दैनंदिन दिनचर्याचा भाग बनवले तर मानसिक आरोग्याच्या समस्यांचे धोके देखील कमी होऊ शकतात.
युरोपियन कॉलेज ऑफ न्यूरोसायकोफार्माकोलॉजीच्या अहवालानुसार, या अभ्यासासाठी चिंता किंवा नैराश्याने ग्रस्त १४१ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. सहभागींना धावणे किंवा औषधे यापैकी निवडण्यास सांगितले होते. १४१ रूग्णांपैकी, ४५ रूग्णांनी अँटीडिप्रेसेंट्सची निवड केली, तर उर्वरित ९६ रूग्णांनी धावणे निवडले. १६ आठवड्यांच्या कार्यक्रमाने आश्चर्यकारक परिणाम दिसले. दोन्ही गटांमधील सुमारे ४४ टक्के सहभागींनी नैराश्य आणि चिंता या दोन्ही लक्षणांमध्ये सुधारणा अनुभवल्या. धावण्याच्या गटातील सहभागींना नैराश्याच्या लक्षणांमध्ये सुधारणा तसेच वजन, कंबरेची चरबी, रक्तदाब आणि हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा दिसून आली.
संशोधक म्हणतात, मानसिक आरोग्य राखण्यासाठी अशा शारीरिक समस्यांकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या आधारावर असे म्हणता येईल की जो गट धावला त्याला अधिक लाभ मिळाला.
जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या गॅलप सर्वेक्षणानुसार, "अमेरिकेमधील सुमारे ३० टक्के प्रौढांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी नैराश्याने ग्रासले आहे. नैराश्याचा जागतिक धोका वाढत आहे, त्यामुळे या मानसिक आजाराचा धोका कमी करू शकतील अशा उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. धावणे हा तुमच्यासाठी सर्वात प्रभावी उपाय असू शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी असाल, तरीही तुम्ही दररोज धावण्याची सवय लावून भविष्यात याचा धोका कमी करू शकता."
हेही वाचा :