Clinical Depression : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? (भाग-२) | पुढारी

Clinical Depression : क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे नेमकं काय? (भाग-२)

डाॅ. भूषण अंबाडकर, न्युरो सायकॅट्रिस्ट

सध्याच्या धकाधकीच्या काळात क्लिनिकल डिप्रेशन (Clinical Depression) ही समस्या खूप गंभीर होत आहे. पहिल्या भागात डिप्रेशनमधील प्राथमिक माहिती (क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे काय? भाग-१) आपण सविस्तर पाहिलेलं आहे. सिविअर डिप्रेशनमुळे लोक आत्महत्येच्या वाटेने निघून जात आहेत. बऱ्याचदा लोक नकारात्मकतेकडे झुकतात, त्यात दारू, गांजा, अशा अनेक व्यसनाच्या आहारी लोक जातात. इतकंच नाही शरीरातील घटकांच्या कमतरतेमुळेही व्यक्ती डिप्रेशनच्या शिकार होतात. तर आज क्लिनिकल डिप्रेशनचे परिणाम, त्याचे प्रकार आणि निदान, या गोष्टी जाणून घेणार आहोत.

क्लिनिकल डिप्रेशनचे परिणाम…

व्यसन सुरू होते : नातेवाईकांची तक्रार अशी असते की, डाॅक्टर हा पूर्वी १५ दिवसांतून ड्रिंक घेत होता. पण, सध्या सतत ड्रिंक करत आहे. यामध्ये सर्वांना असं वाटतं याला दारूचं व्यसन लागलं आहे. पण, त्यामागे डिप्रेशन असण्याची शक्यता असते. ती व्यक्ती डिप्रेशनमधून त्वरीत आनंद मिळावा म्हणून ड्रिंक घेते. त्याला दारूचं व्यसन असत नाही. पण, यात त्याला त्वरीत आनंद मिळत असला तरी तो नकारात्मकतेकडे झुकतो आहे, हे त्याच्या लक्षात येत नाही. हेच गांजा पिणे किंवा इतर अंमली पदार्थांच्या सेवनाकडे वळतो. तो कसा वळला हे त्यालाच कळत नाही.

शरीराचं दुखणं : काही लोकांना मणक्याचा त्रास असतो. पायाला त्रास सुरू असतो, पोटाचं दुखणं असतं, त्याला लूज मोशन होणं, पायाचं, डोक्याचं, हाताचं दुखणं, अशा अनेक शारीरिक व्याधी सुरू होतात. पण, ज्यावेळी डाॅक्टरांकडे जाऊन विविध तपासण्या करतो. तेव्हा त्यात काहीच असत नाही. प्राॅब्लेम त्या शरीराच्या भागाचा नसतो. त्याचा मेंदूमध्ये झालेल्या रासायनिक बदलांचा प्राॅब्लेम असतो. तर त्यातून आलेल्या उदासिनतेमुळे शरीराचं दुखणं सुरू असते.

क्लिनिकल डिप्रेशनचे प्रकार

माईल्ड डिप्रेशन : या प्रकारात जास्त धोका असत नाही. माईल्ड डिप्रेशन हे प्रत्येक माणसाला असण्याची शक्यता असते. प्रेमात धोका मिळालेल्या व्यक्तीची उदासिनता या प्रकारात मोडते. ही काही तासांसाठी किंवा काही दिवसांसाठी असते. यात सायकोथेरेपी करण्याची आवश्यकता नसते.

माॅडरेट डिप्रेशन : यामध्ये दोन आठवड्यांपेक्षा जास्त उदासिनता असते. या प्रकारात व्यक्तीच्या वागण्यात अचानक बदल होतात. या डिप्रेशनमध्ये कौन्सलिंगद्वारे व्यक्तीला ठीक करता येते. जर यात व्यक्ती बरा झाला नाही तर, तो सिविअर डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे.

सिविअर डिप्रेशन : या प्रकारात व्यक्ती भावनिक पातळीवर तुटून जातो. रोजच्या वागण्यात आणि त्याच्या खाण्या-पिण्यात थेट बदल होतात. त्याची झोपदेखील नाहिशी होते. यामध्ये व्यक्तीला वेळेवर उपचार मिळाले नाहीतर तर आत्महत्येकडे वळू शकतो. यामध्ये व्यक्तीचा जास्त काळजी घ्यावी लागते.

उदाहरणार्थ : सिविअर डिप्रेशनमध्ये (Clinical Depression) संबंधित व्यक्ती खूप मोठा धोका पत्करत असतो. ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या जीवाचाही विचार करत नाही. म्हणजे रस्त्यांवरून गाडी अतिवेगाने चालविणे, त्यात त्याला असं वाटतं की, माझं आयुष्य संपत आलेलं आहे, मी इतरांचा कशाला विचार करू. म्हणजेच काय स्वतःचं आयुष्य संपविण्याचा विचार करणं किंवा कुणीतरी माझं आयुष्य संपवून टाकावं, असं वाटणे.

क्लिनिकल डिप्रेशनचे निदान…

मेंटल स्टेटस एक्झामिनेशन : संबंधित व्यक्ती रुग्णालयात आला की, तो डिप्रेशनमध्ये आहे की दुसरं काही… हे तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात येते. यातून व्यक्तीशी चर्चा केली जाते, त्याला नेमका कोणता मानसिक प्राॅब्लेम आहे, त्यातून स्पष्ट केल्या जातात.

रक्ताची तपासणी : संबंधित व्यक्तीच्या रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबीनची तपासणी केली जाते. यात व्यक्तीचा आहार कमी झाला, तर हिमोग्लोबीन कमी होते. त्यातून उदासिनता वाढते. व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते.

व्हिटॅमिनची तपासणी : शरीरातील व्हिटॅमिनची तपासणी करून घ्यावी लागते. शरीरात व्हिटॅमिनची कमी झाली की, डिप्रेशनमध्ये व्यक्ती जाण्याची शक्यता आहे. डी-व्हिटॅमिनची कमी असते. एकंदरीत काय तर… व्हिटॅमिनची कमी झाली तर व्यक्ती डिप्रेस्ड होऊ शकते.

क्लिनिकल डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीवर कोणत्या प्रकारचे उपचार केले जातात. त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी डाॅक्टर आणि इतर संबंधित घटक कसे काम करतात… याची माहिती सविस्तर पुढील लेखात जाणून घेऊ…

क्रमश:

हे वाचलंत का? 

Back to top button