Yearly Horoscope 2023 : आजची रास तूळ : प्रगतीकडे वाटचाल व गृहसौख्यात वाढ | पुढारी

Yearly Horoscope 2023 : आजची रास तूळ : प्रगतीकडे वाटचाल व गृहसौख्यात वाढ

होराभूषण : रघुवीर खटावकर

तूळ रास ही वायुतत्त्वाची रास असून या राशीत चित्रा नक्षत्र 3 रे 4 थे चरण (वायुतत्व), स्वाती नक्षत्रे (अग्नितत्त्व), विशाखा नक्षत्र 1, 2, 3 चरण (वायुतत्त्व) अशी नक्षत्रे आहेत.

तूळ राशीच्या व्यक्तींत विशेषत: स्त्रियांमध्ये शुक्राचे सौंदर्य असतेच; पण यांचे बोलणे अतिशय लाघवी असते. पण, तूळ ही पुरुष राशी आहे, तर राशीस्वामी शुक्र स्त्री आहे. यामुळेच राशीच्या व्यक्ती न्यायी असतात. यांचे सौंदर्य त्यागी असते. त्यात छचोरपणा नसतो. शुक्राच्या गुणधर्माप्रमाणे या राशींच्या व्यक्तींमध्येही कलासक्ती असते.

या वर्षी दि. 17 जाने 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश करील. तो तूळ राशीसाठी रौप्य पादाने येत असल्यामुळे शुभ फलदायी आहे. शनी कुंभ राशीत अडीच वर्षे राहील.

कुंभेतील शनी तूळ राशीसाठी 5 वा आहे. तो तुळेसाठी चतुर्थेशही आहे व पंचमेशही आहे. संततीसाठी प्रॉपर्टी करून ठेवणे शक्य होईल, तसेच शिक्षणात चिकाटीने पुढे जाल. जोडीदाराच्या प्रकृतीची मात्र काळजी राहील. भावनिक ताणतणाव निर्माण होऊ शकतील.

यावर्षी दि. 21 एप्रिल रोजी गुरू मेष प्रवेश करेल तो तूळ राशीसाठी ताम्रपादाने येत असल्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना श्रीप्राप्ती म्हणजे धनसंपदा, विद्या, यशप्राप्ती करून देणारा राहील. हा गुरू तूळ राशीला 7 वा म्हणजे उत्तम फलदायी रहाणार आहे.

जानेवारी ते 21 एप्रिलपर्यंत गेल्या वर्षीप्रमाणे (2022) गुरूची फळे मिळत राहतील. यामुळे यश तुम्हाला मिळत राहील. हाताखालील व्यक्ती विश्वासू मिळतील. कोणतेही समारंभ सुखरूप पार पडतील; पण नातलगांकडून त्रास होईल व अपेक्षित प्रसिद्धी मिळणार नाही.

21 एप्रिलनंतर गुरू तूळ राशीला 7 वा आल्यामुळे मंगलकार्यासाठी प्रवास होतील. स्त्री सौख्य वाढेल. पुत्रप्राप्ती होईल. राजसन्मान लाभेल. दिवानी दावे अनुकूल होतील. उपवर मुलींचे विवाह ठरतील. न्याय मिळेल. 18 फेब्रुवारी 2023 रोजी नेपच्यून मीन राशीत प्रवेश करेल. तो तूळ राशीसाठी लोहपादाने येत असल्यामुळे कष्टप्रद फळे देईल. तो षष्ठस्थानी म्हणजे मीन राशीत पुढील 14 वर्षे रहाणार आहे. या काळात चुकून चुकीचे औषध घेतल्यामुळे त्रास होण्याची शक्यता राहील. मातुल घराण्यातील व्यक्तींचे वागणे संशयास्पद राहील.

तूळ राशीला रवी 3 रा धनुत (जाने.), 6 वा मीनेत (मार्च-एप्रिल), 10 वा 11 वा कर्केत सिंहेत (जुलै-ऑगस्ट, ऑगस्ट-सप्टें.) यश मिळवून देणारा राहील. नोकरीत बढती मिळू शकेल. या काळात कमी श्रमात संधी चालून येतील. विवाह जुळू शकतील.

तूळ राशीला रवी 4 था मकरेत (डिसें-जाने), रवी 8 वा वृषभेत (मे-जून), रवी 12 वा कन्येत (सप्टें.-ऑक्टो.) असताना घरगृहस्थीची काळजी, धंद्यातील मंदी, धंद्यातील स्पर्धा व आर्थिक हानी याचा अनुभव येईल.
मंगळ या वर्षी वृषभ ते वृश्चिक राशीतून म्हणजे तूळ राशीच्या 8 व्या ते 2 र्‍या स्थानातून भ्रमण करणार आहे. त्याच्या वृषभेतील भ्रमण (जाने.-फेब्रु.-मार्च) अशुभ फलदायी राहील. कर्केतील भ्रमणात (मे-जून) नोकरदारांची बदली होऊ शकेल; पण याच काळात जोखमीची कामे करताना अपघात होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. शुक्राचे मीन-मेषेतील भ्रमण (फेब्रु.-मार्च) भावनिक दडपर आणणारे राहील, तर त्याच्या कर्केतील भ्रमणात (जून) कामाकडे दुर्लक्ष झाल्यास कामात नुकसान होऊ शकेल.

शुक्राच्या मिथुनेतील भ्रमणात (मे-जून) भाग्यकारक अनुभव येतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. तूळ राशीचा भाग्यविधाता बुध हा तूळ राशीस्वामी शुक्राचा मित्र असल्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तींना बुद्धिकौशल्याने लाभ करून देईल. तूळ राशीच्या सप्तमस्थानी गुरू हर्षल राहू असल्यामुळे भावनिक दडपण येईल. अचानक विवाहासाठी स्थळ चालून येईल; पण पूर्णपणे नीट चौकशी केल्याशिवाय विवाह ठरवू नका.

सप्तमातील राहू हर्षल तूळ व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात भावनिक वादळे निर्माण करू शकतील. तूळ लग्नी केतू असल्यामुळे पूर्वग्रहदूषित राहाल. दि. 28 नोव्हेंबर 2023 रोजी राहू मीनेत व केतू कन्येत प्रवेश करील. प्लुटो राशीच्या चतुर्थस्थानी असल्यामुळे घरगृहस्थीची व्याप्ती मोठी असेल व त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षाही अवाजवी राहतील.

एकदंरीत पाहता गुरुकृपा वर्षातील शेवटच्या 9 महिन्यात लाभणार असल्यामुळे हे वर्ष प्रगतिपथावर नेणारे राहील. याशिवाय शनीसुद्धा यापूर्वी राशीला 4 था होता, तो यावर्षी राशीला 5 वा असल्यामुळे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने हे वर्ष चांगलेच राहील. गृहसौख्यात वाढ होईल व प्रगती पथावर राहाल.

Back to top button