Yearly Horoscope 2023 : आजची रास कन्या : पूर्वसंचित टिकणारे; पण संमिश्र फलांचे वर्ष राहील | पुढारी

Yearly Horoscope 2023 : आजची रास कन्या : पूर्वसंचित टिकणारे; पण संमिश्र फलांचे वर्ष राहील

होराभुषण : रघुवीर खटावकर

कन्या रास ही पृथ्वी तत्त्वाची रास असून या राशीत उत्तर 1, 2, 3, 4 चरणे हस्त व चित्रा नक्षत्रे आहेत. ही सर्व नक्षत्रे वायुतत्त्वाची असल्यामुळे या राशीची गणना बौद्धिक राशीत होते.

कन्या राशी स्वामी बुध हा भूमीतत्त्वाचा आहे. कन्या राशीच्या व्यक्ती सर्व क्षेत्रांत आढळून येतात. प्रत्येक कामात, प्रत्येक क्षेत्रात बुद्धीची आवश्यकता असते. या राशीच्या व्यक्ती जास्त चिकित्सक असतात. अतिशय क्लिष्ट विषय हे लिलया हाताळतात. शैक्षणिक, प्रिटिंग इ. क्षेत्रांत या व्यक्तींचा वावर असतो. दोन व्यक्तीमध्ये समेट घडवून आणण्याचे काम हे चांगले करतात. हे चांगले समुपदेशक होऊ शकतात. दळणवळण, दूरध्वनी, कॉम्प्युटर ही बुधाची क्षेत्रे आहेत.

बुधाच्या दुसर्‍या राशीपैकी ही एक स्त्री राशी आहे. बुधाच्या या राशीत फक्त बुधच उच्च्च फल देतो. बुध भूमी तत्त्वाचा असल्यामुळे भूमीतत्त्वाची म्हणजे पृथ्वीतत्वाची रास बुधाला जास्त अनुकूल राहते. बुध हा बुद्धिदाता व वायुतत्त्व हे बुद्धिमत्तेचे कारक असल्यामुळे सर्व नक्षत्रे वायुतत्त्वाची असलेली कन्या रासच बुधासाठी उच्च फल देण्यास योग्य आहे.

यावर्षी 21 एप्रिल 2023 पर्यंत गुरू हा मीन राशीत व कन्या राशीच्या सप्तमस्थानी उत्तम असल्यामुळे हा काळ कन्या राशीसाठी मानसन्मान, पुरस्कार मिळवून देणारा, धनप्राप्ती करून देणारा आहे. या काळात कन्या राशीचे क्षेत्र आणखी वाढणारे आहे. विवाह, संततीसाठीसुद्धा एप्रिलपर्यंतचा काळ जास्त अनुकूल राहील. परदेशाशी संबंधित व्यवहारात उत्तम यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर राहाल.

गुरू 21 एप्रिल 2023 रोजी मेष राशीत कन्या राशीसाठी लोहपादाने प्रवेश करत असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींचे कष्ट वाढवणार आहेत. शारीरिक दगदग वाढेल. या काळात अगदी लहान शारीरिक तक्रारीकडेसुद्धा दुर्लक्ष करू नका. कारण, ही तक्रार केव्हढी वाढणार आहे, याचा अंदाज येऊ शकणार नाही. या काळात प्रवासात क्लेश, धनहानी, मानखंडणा, रोग यासारखा अनुभव येईल.

हा 8 वा गुरू अकल्पित द्रवलाभ करून देणारा, वारसा मिळवून देणारा असून अकल्पित द्रव लाभ करून देणाराही आहे. शनी हा राशीसाठी पंचमेश-शष्ठेस असून भाग्य बलवान करणारा असतो. या वर्षी शनी 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत कन्या राशीसाठी ताम्रपादाने प्रवेश करत असल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना श्रीप्राप्ती म्हणजे धनसंपदा, विद्या, यश मिळवून देणारा आहे. हा शनी अडीच वर्षे कुंभ राशीत राहील व भाग्य बलवान करील. कन्या राशीच्या 60 व्या स्थानातील हा शनी शत्रूवर विजय मिळवून देणारा आहे. आरोग्यप्राप्ती होईल. वैवाहिक सौख्य लाभेल; पण विषारी जनावरांची भीती राहील. नेपच्यून हा 18 फेब्रुवारी 2023 रोजी मीन राशीत प्रवेश करील. हा नेपच्यून कन्या राशीसाठी रौप्य पादाने येत असून शुभ फले निर्माण करणारा आहे. तो कन्या राशीच्या समस्थानी पुढील 14 वर्षे रहाणार आहे. तो जोडीदार, भागीदार, परदेशी संबंधित व्यवहारांचे बाबतीत शुभ फले निर्माण करीत किंवा शुभ फळात वाढ करेल.
कन्या राशीसाठी रवी 6 वा कुंभेचा (फेब्रु.-मार्च), 10 वा -11 वा मिथुन कर्केचा (जून-जुलै, जुलै-ऑगस्ट) व 3 रा वृश्चिकेचा (नोव्हें.-डिसें.) उत्तम फळे देणारा राहील. कामात यश मिळेल. इतर ग्रहांना जी शुभ फळे द्यायचीत त्यातही प्रयत्न, शत्रुनाश व कर्मप्रधान राहिल्यामुळे वाद करून देईल.

कन्या राशीसाठी रवी 4 वा धनूचा (डिसें.-जाने.) 8 वा मेषेचा (एप्रिल-मे) 12 वा सिंहेचा (ऑगस्ट-सप्टें.) गृहसौख्याची काळजी लावणारा, धनहानी व धंद्यात मंदीचे वातावरण निर्माण करणारा व धंद्यातील स्पर्धा वाढवून मोठे खर्च निर्माण करणारा राहील.

यावर्षी मंगळाचे भ्रमण वृषभ ते वृश्चिक राशीतून होणार आहे. वृश्चिक व कर्क राशीचे भ्रमण लाभ करून देणारे, सुवर्णालंकाराची प्राप्ती करून देणारे, आरोग्य वृद्धी करणारे राहील. कर्क व सिंह राशीतील मंगळाची दृष्टी शनीवर असल्यामुळे मातुल घराण्यातील व्यक्तींचे नुकसान व शिक्षणात अडचणी निर्माण करणारे राहील.

शुक्राचे कुंभराशीतील भ्रमण व मीन राशीतील भ्रमण (जाने.-फेब्रु.-मार्च) स्पर्धा वाढविणारे व मानसिक दडपण निर्मार करणारे राहील. शुक्राचे मिथुन राशीतील भ्रमणात (मे 2023) धंदा, व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होण्याची शक्यता राहील. राशीस्वामी बुधाच्या सर्व राशीतील भ्रमणात तो बुद्धिकौशल्याने कामात यश व लाभ मिळवून देणारा राहील; पण त्याच्या स्वराशीच्या भ्रमणात (ऑक्टो. 2023) महत्त्वाकांक्षी बनाल; पण बोलण्याने माणसे दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. प्लुटो वर्षभर कन्या राशीच्या पंचमस्थानी रहाणार आहे. एखादी नवीन संस्था स्थापन करण्यास अनुकूलता लाभेल. तुम्ही वर्षभर करत असलेल्या कामाचा फायदा तुमच्यापेक्षा तुमच्या संस्थेला जास्त होईल.

अष्टमस्थानातील राहू हर्षल गुरू हे शारीरिक पिडेची तीव्रता वाढवू शकतील. कन्या राशीच्या दुसर्‍या स्थानातील केतूमुळे कुटुंबातील कटुता जाणवेल. एकंदरीत पाहता सुरुवातीचा काळ गुरुकृपेचा राहील. संपूर्ण वर्षभर शनी तुमचे भाग्य बलवान करून कर्माला भाग्याची जोड देणारा राहील; पण संमिश्र फल देणारा व पूर्वसंचित टिकवणारे हे वर्ष राहो.

Back to top button