इंटरनेट क्रांतीचं ‘पाचवं’ पाऊल | पुढारी

इंटरनेट क्रांतीचं ‘पाचवं’ पाऊल

  • महेश कोळी, आय.टी. तज्ज्ञ

भारतात फाईव्ह-जी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील निवडक शहरांत फाईव्ह-जी सेवा मिळणार असून, ती टप्प्याटप्प्याने सर्व देशात उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी फाईव्ह-जी तंत्रज्ञानातील योग्य कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

औद्योगिकीकरणानंतरच्या अडीचशे वर्षांपेक्षा अधिक काळात जग बदलले नसेल, एवढे इंटरनेटच्या आगमनानंतर अडीच दशकांत बदलले आहे. या काळात जगभरात केलेले संशोधन, शोध हे क्रांतिकारी आहेतच, त्याचबरोबर मानवी जीवनावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. अर्थात, याचे अनेक दाखले देता येतील. पूर्वी बँकेत पैसे जमा करण्यासाठी लागणारा वेळ आणि आता मोबाईल बँक अ‍ॅप्सच्या मदतीने पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी लागणारा वेळ, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. अशी किती तरी उदाहरणे देता येतील. कोरोना काळात तर इंटरनेटने मोलाची कामगिरी बजावली आहे.

संपूर्ण जग लॉकडाऊनच्या कुलपात अडकलेले असताना इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात संवादाची प्रक्रियाच नव्हे; तर व्यवहारही सुरळीत सुरू होते. त्यामुळे इंटरनेट हे आज विकासाचे नवीन साधन म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, या प्रगतीमुळे थक्क होत असतानाच याचे आणखी अत्याधुनिक आविष्कार समोर येणे बाकी आहेत. फाईव्ह-जी तंत्रज्ञान हे या नव्या दालनाचे प्रवेशद्वार म्हणावे लागेल. देशात लवकरच इंटरनेटसेवेच्या या पाचव्या जनरनेशची सुरुवात होत आहे.

‘गरज ही शोधाची जननी’ मानली जाते. अर्थात, ही बाब केवळ विज्ञानाला लागू होते, असे नाही. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानावरचे वाढते अवलंबित्व पाहता कालपरत्वे सध्याचे तंत्रज्ञान हे कालांतराने कालबाह्य होत जाते. म्हणून त्यास ‘अपडेट’ करण्याची किंवा बदलण्यासाठी गरज भासू लागते. एक काळ असा होता की, मोबाईल फोन काय तर लँडलाईनसारखा साधा फोन मिळणेदेखील कठीण होते. लँडलाईनच्या कनेक्शनसाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागायची. काळ बदलला आणि लोकांच्या हातात मोबाईलसारखी जादूची छडी आली. या माध्यमातून केव्हाही, कोणाला, कोठेही, कोठूनही आणि कधीही फोन करता येणे शक्य झाले. यास भरीस भर म्हणजे मोबाईल फोन स्मार्ट झाले तेव्हा मानवी जीवन अधिकच सुकर झाले. मोबाईलमध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि संवाद प्रक्रियेचा कायापालटच झाला. आता केवळ बोलणे पुरेसे नाही; तर व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातूनदेखील बोलणार्‍यांचा चेहरा पाहता येणे शक्य झाले. इंटरनेटशी निगडित सर्व काम फोननेच होऊ लागले. चालताना, प्रवासात असताना मोबाईलवर गाणे ऐकले जाऊ लागले, चित्रपट पाहता येऊ लागले, चॅटिंगही करता आले.

इंटरनेटमुळे सर्व गोष्टी एका क्लिकवर आले असले, तरी इंटरनेटचा वेग हा यात सर्वात मोठा अडथळा. आता फाईव्ह-जी तंत्रज्ञान वेगाच्या समस्येवर उत्तर घेऊन आले आहे. फाईव्ह-जी सेवा सुरू झाल्यानंतर एखादा चित्रपट केवळ 20 सेकंदांतच डाऊनलोड करणे शक्य आहे. फोर-जी तंत्रज्ञानात यासाठी पाच मिनिटे लागायची. याचाच अर्थ ढोबळमानाने फाईव्ह-जीचा वेग हा फोर-जीपेक्षा दहापट अधिक आहे. ही गती फोर-जीवर 45 मेगाबाईट प्रतिसेकंद (एमबीपीएस) असते आणि ती फाईव्ह-जीमध्ये 1 हजार एमबीपीएसपर्यंत राहू शकते. साधारणपणे फाईव्ह-जी नेटवर्क हे 30 ते 300 गीगाहर्टज् (मि.लि. वेव्ह) स्पेक्ट्रममध्ये काम करण्याची क्षमता ठेवते. या नेटवर्कच्या माध्यमातून कोणताही डेटा अधिक प्रमाणात वेगाने पाठवता येणे शक्य राहते. या नेटवर्कवर परिसरातील सिग्नलचे अडथळे फार राहणार नाहीत. फोर-जी इंटरनेटचा कमाल वेग हा एक गीगाबाईट प्रतिसेकंद मानला जातो, तर फाईव्ह-जीमध्ये हायबँड स्पेक्ट्रम इंटरनेटचा किमान वेग 20 जीपीबीएस (गीगाबाईट प्रतिसेकंद) असतो. डेटा ट्रान्स्फरचा वेग वाढविण्यासाठी या क्रांतीने अनेक लाभ होणार आहेत.
फाईव्ह-जी इंटरनेट (बेसिक डेटा ट्रान्स्फर) चा वेग सुमारे 20 गीगाबाईट प्रतिसेकंदपर्यंत राहणार आहे. अर्थात, यात ग्राहकांना जवळपास 10 एमबीपीएस (मेगाबाईट प्रतिसेकंद) चा वेग मिळू शकतो. तरीही हा वेग सध्याच्या फोर-जी एलटीई नेटवर्कच्या 20 ते 40 पट अधिक आहे. फाईव्ह-जीमुळे अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल उपकरणांना एकमेकांशी जोडणे (कनेक्ट करणे) सोपे जाणार आहे. या वेगामुळे दूरवर असलेल्या सर्व उपकरणांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. ज्या चालकविरहित मोटारीवरून भविष्यातील चित्र रंंगवले जात आहे ते फाईव्ह-जीच्या तंत्रज्ञानावरच अवलंबून असणार आहे. फाईव्ह-जीमुळे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची चांगल्यारीतीने हाताळणी करणे शक्य होणार आहे. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण म्हणजेच ‘ट्रू एचडी लाईव्ह स्ट्रिमिंग’ हे फाईव्ह-जीमुळे शक्य आहे. यामुळे संवादाची प्रक्रिया वेगाने होईल. फोर-जी नेटवर्क वापरणार्‍या ग्राहकांची संख्या कोटींच्या घरात असल्याने या नेटवर्कवर सातत्याने दबाव राहतो. परिणामी, कंजेशनची समस्या राहते. फाईव्ह-जी नेटवर्कमध्ये ही समस्या राहणार नाही.

फाईव्ह-जी तंत्रज्ञान ही एकप्रकारची वायरलेस कनेक्टिव्हिटी असून, त्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजेच रेडिओ वेव्हज् (रेडिओ लहरी) चा वापर केला जातो. साहजिकच, फाईव्ह-जी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी रेडिओ स्पेक्ट्रमबाबत जाणून घ्यावे लागेल. शास्त्रीय भाषेत एका निश्चित काळानंतर रेडिओ लहरी पुन:पुन्हा येत असतील; तर त्यास वेब फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. ही फ्रिक्वेन्सी हर्टस्मध्ये मोजली जाते. कोणत्याही रेडिओ लहरी पुन:पुन्हा येण्यासाठी जो वेळ लागतो, त्याला वेव्हलेंथ असे म्हणतात. याचाच अर्थ असा की, जेव्हा लहरींचे प्रमाण (फ्रिक्वेन्सी) वाढते, तेव्हा वेव्हलेंथ कमी होऊ लागते. यामुळे रेडिओ लहरी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वेगाने जातात खर्‍या; पण त्या लांबचा पल्ला गाठू शकत नाहीत. वास्तविक, या लहरींची वेव्हलेंथ कमी असल्याने त्या विविध अडथळ्यांना भेदू शकत नाहीत. याउलट फ्रिक्वेन्सी कमी आणि वेव्हलेंथ अधिक असेल; तर लहरींची गती कमी असली तरी त्या अधिकचा पल्ला गाठू शकतात. या संकल्पनेतील नेटवर्क आपण हाताळले आहे. वन-जी, टू-जी, थ्री -जी, फोर-जीच्या तुलनेत लोअर फ्रिक्वेन्सी बँडवरदेखील इंटरनेट उपलब्ध होते. यात स्पीड कमी असला, तरी व्यापकता अधिक राहते. या कारणामुळे दुर्गम भागातदेखील कमी वेगाचे टू-जी किंवा थ्री-जी इंटरनेटचे नेटवर्क सहजपणे मिळते; पण फोर-जी सेवा ही हायर फ्रिक्वेन्सी बँड इंटरनेटवर उपलब्ध होते. परिणामी, कनेक्टिव्हिटी चांगली मिळते; परंतु दुर्गम भागात किंवा बंद खोलीत अनेकदा फोर-जीचे नेटवर्क मिळत नाही. या कारणामुळे जेव्हा एखाद्या बंद खोलीत किंवा तळघरात आपण असलो तर फोर-जी तंत्रज्ञानाच्या मोबाईलवर संवाद साधणेदेखील कठीण होऊ शकते. बोगद्यातून जातानादेखील नेटवर्क गायब होते; पण फाईव्ह-जी तंत्रज्ञानात या सर्व समस्येवर उपाय आहे. अर्थात, ही सेवा दुर्गम  भागापर्यंतदेखील सहजपणे लवकर पोहोचावी आणि त्याचा दरदेखील सामान्यांच्या आवाक्यात यावा.

पुढील एक-दोन वर्षांत हायस्पीड इंटरनेट फाईव्ह-जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटर व्हिजन, इंडस्ट्रियल आयओटी, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यासारखे तंत्रज्ञान लोकांना विचार करणे, राहणीमान तसेच कमाई करण्यापर्यंतच्या सर्व गरजांना पूर्णपणे बदलण्याचे काम करेल. या कारणास्तव तरुणवर्गाने शक्य तितक्या लवकर वरीलपैकी किमान एका तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे. जितक्या लवकर एखादे कौशल्य आत्मसात कराल तितक्या लवकर रोजगारासाठी तुम्ही स्वतःला तयार कराल.
2030 पर्यंत फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचे ‘जीडीपी’तील योगदान 42 अब्ज इतके असेल, असा अंदाज आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक उद्योगात परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे. अशावेळी जर ए.आय., एम.एल., क्लाऊड आणि इंडस्ट्रियल आय.ओ.टी.सारख्या नव्या युगातील तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करीत असाल; तर ते व्यावसायिक स्वरूपात तुमच्या करिअरला शंभर टक्के साहाय्यभूत ठरेल आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करेल. नव्या तंत्रज्ञानात एक यशस्वी करिअर करण्यासाठी तुम्हाला काही कौशल्ये आत्मसात करावी लागतील.

राष्ट्रीय दूरसंचार कौशल्य संस्थेच्या मते, भारताला फाईव्ह-जीचा पूर्ण क्षमतेने लाभ घेण्यासाठी 2025 पर्यंत 2.2 कोटी कुशल मनुष्यबळाची गरज भासेल. सद्यस्थितीत हे तंत्रज्ञान शिकणे आणि त्यात कौशल्य प्राप्त करणे आणि स्वतःला त्यात कुशल बनवणे तरुणांसाठी चांगला पर्याय असेल. फाईव्ह-जी तंत्रज्ञान लाँचिंगनंतर जवळपास 40 ते 50 दशलक्ष ग्राहक याच्याशी जोडले जाऊ शकतात. या मोठ्या संख्येच्या ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. या संधींचा विचार करता फाईव्ह-जी तंत्रज्ञानातील योग्य कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे.

Back to top button