लवंग पीक आपल्याकडेही घेता येते; जाणून घ्या लागवड कशी करावी?

लवंग पीक आपल्याकडेही घेता येते; जाणून घ्या लागवड कशी करावी?
Published on
Updated on

– अनिल विद्याधर

मसाल्याच्या पदार्थात लवंगेचे स्थान उच्चदर्जाचे आहे. चमचमीत आणि झणझणीत पदार्थांची लज्जत लवंगेमुळेच वाढवली जाते. लवंग जंतुनाशक आणि कफनाशक आहे. या पिकाची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये हे पीक घेतले जात असले तरी आपल्याकडे कोकणातही हे पीक घेतले जाऊ शकते.

मसाले पिकात लवंग हे अतिशय महत्त्वाचे स्थान असलेले किमती पीक आहे. भारतात प्रामुख्याने हे पीक केरळ, तामिळनाडू, आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. लवंगाचा उपयोग अन्न पदार्थांना स्वाद आणि चव देण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्या औद्योगिक उत्पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो. टुथपेस्ट, दातदुखीवरील औषधे, पोटातील विकारांवर औषधे तसेच उत्तम प्रतीची अत्तरे सुवासिक साबण आणि व्हेनिला तयार करण्यासाठी लवंग तेलाचा उपयोग होतो. लवंगापासून 15 ते 17 टक्के तेल मिळते.

हवामानातील साधर्म्यामुळे केरळप्रमाणेच महाराष्ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठांतर्गत असणार्‍या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते आणि त्यामध्ये पीकांची वाढ आणि उत्पन्न समाधानकारक असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे कोकण कृषी विद्यापीठाबरोबरच कोकणातील जिल्हा परिषदा शेतकर्‍यांना लवकर लागवडीसाठी प्रात्साहन देत आहेत.

आपण मसाल्यात वापरतो ती लवंग म्हणजे लवंगाच्या झाडावरची कळी होय. पूर्ण वाढलेल्या कळ्या काढून उन्हात वाळविल्या की लवंग होते. परंतु त्या तशाच वाढू दिल्यास त्यांचे फुलांमध्ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्हणजेच एका कळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते.

लवंग हे उष्णकटिबंधातील झाड असून त्यास उष्ण दमट हवामान लागते. समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते. 20 ते 30 अंश सेंग्रे. तापमान 1500 ते 2500 मिमी. पाऊस आणि 60 ते 95 टक्के आर्द्रता या पिकास चांगली मानवते. प्रखर सूर्याच्या उष्णतेमुळे पाने आणि खोडावर करपण्याची क्रिया होऊन झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. म्हणून या पिकास सावलीची आवश्यकता असते. लवंगाचे पीक बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनीत येत असले तरी अधिक खोलीच्या उत्तम निचर्‍याच्या आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे, अशा जमिनी अधिक मानवतात.

भारतात लवंगाची लागवड ज्या भागात मोठ्या प्रमाणात झालेली आहे तेथे जवळ जवळ प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो आणि तापमान सौम्य असते. त्यामुळे तेथे लवंगाची लागवड उघड्यावर केली जाते आणि पाणीपुरवठ्याची गरज भासत नाही. याउलट आपल्याकडे परिस्थिती आहे. त्यामुळे लवंग झाडास ऊन आणि वार्‍यापासून संरक्षण मिळू शकेल असे आदर्श ठिकाणी म्हणजे नारळ किंवा सुपारीची बाग, पूर्वेस उतार असलेल्या डोंगरउतारावर तसेच दोन डोंगरांच्या दरीतील प्रदेशात पाणीपुरवठ्याची सोय असल्यास उघड्यावर देखील लवंगाची लागवड यशस्वी होते.

नारळ किंवा सुपारीच्या बागेत लवंगेची लागवड करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. ते म्हणजे नारळ आणि सुपारीच्या झाडांमध्ये योग्य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी हे आंतरपीक म्हणून घेता येते आणि चांगले उत्पन्न मिळते.

योग्य अंतर ठेवलेल्या नारळ किंवा सुपारीच्या बागेत लागवड करावयाची असल्यास चार नारळ किंवा सुपारीच्या मध्यभागी लवंगेची रोपे लावावे. सुपारी बागेमध्ये मात्र नंतरचे रोप दोन चौकोन मोकळे सांडून तिसर्‍यात लावावे. दोन डोंगरांच्या दरीतील लागवड 66 मीटर अंतरावर करावी. निवडलेल्या जागी 45 सेमी. लांब, रुंद आणि खोल खड्डे उन्हाळ्यात खोदावे. खड्ड्याच्या मातीतील दगड वेचून काढून मातीमध्ये 2 ते 3 टोपल्या शेणखत मिसळावे आणि खड्डा भरावा. खड्डा जमिनीपेक्षा थोडा अधिक उंच भरावा.

समुद्रकिनार्‍यावरील जमिनीत खड्डे भरताना खड्ड्याच्या मातीत अर्धी तांबडी माती किंवा शक्य असेल तर गाळाची माती वापरावी. लवंगाची लागवड कोणत्याही हंगामात केली तरी चालते. जोरदार पाऊस संपल्यानंतर लागवड करण्याचे फायद्याचे ठरते. लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप वापरावे. अगोदरच भरुन ठेवलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी रोपांच्या पिशवीच्या आकाराचा खड्डा उकरावा. रोप असलेल्या प्लास्टिक पिशवी, मातीत हुंडी फुटणार नाही अशा पद्धतीने काढून तयार करावी. पहिल्या वर्षी लवंगाच्या रोपांना सावलीची व्यवस्था करणे जरूरीचे आहे.

लवंगेच्या झाडाला पाणीपुरवठा करताना…

लवंगेच्या झाडाला पाणीपुरवठा करताना जमिन सतत ओलसर राहील मात्र दलदल होणार नाही याची दक्षता घ्यावी. दलदलमुळे मररोग येण्याची शक्यता असल्यामुळे ते टाळण्यासाठी एकाचवेळी खूप पाणी देण्यापेक्षा थोडे थोडे पाणी अनेकवेळा द्यावेत. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी रोपाभोवती 45 ते 60 सेंमीपर्यंत पालापाचोळ्याचे अच्छादन करावे.

लागवडीसाठी दोन वर्षाचे रोप उपयोगात आणलेले असल्यास लागवड केल्यानंतर 4 ते 5 वर्षात लवंगाच्या झाडाला फुले येऊ लागतात. फुले दोन हंगामात येतात. फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान पहिले आणि प्रमुख उत्पन्न मिळते तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दुसरे आणि अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते. नवीन पालवीवर उत्पन्नाच्या कळ्या येतात.

किती मिळते उत्पादन…?

कळीचा अंकुर दिसायला लागल्यापासून 5 ते 6 महिन्यांत कळी काढण्यासाठी तयार होते. गुच्छातील सर्व कळ्या एकाच वेळी काढण्यासाठी तयार होत नाहीत. कळ्यांचा घुमट पूर्ण वाढल्यानंतर त्यांना फिकट नारिंगी रंग प्राप्त होतो. अशाच कळ्यांची काढणी करावी आणि त्या उन्हात वाळवाव्यात. साधारणपणे 4 ते 5 दिवसात कळ्या वाळतात. लवंगाच्या 15 ते 20 वर्षांच्या झाडापासून 2 ते 3 किलो वाळलेल्या लवंगा मिळतात.

रोगाचा प्रादुर्भाव कसा रोखाल?

रोपांना तसेच पूर्ण वाढलेल्या झाडांना पाने कुजणे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सुरुवातीस पानांच्या टोकावर आणि कडांवर काळसर ठिपके किंवा चट्टे दिसून येतात. कालांतराने टोकाकडचा भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होते. अशी पाने अकाली गळून पडतात. या रोगामुळे कोवळ्या पानाच्या दोन्ही बाजूस तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात. ठिपके पसरत जाऊन आकाराने मोठे होतात. पान पिवळे होते आणि कालांतराने गळून पडते.

रेताड आणि निकस तसेच कमी निचर्‍याच्या जमिनीत लागवड केल्यास झाडांना डायबॅक रोग प्रामुख्याने होतो. तसेच पाणीपुरवठ्यात अनियमितपणा झाला तरीदेखील हा रोग उद्भवतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या झाडावरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतराने संपूर्ण झाड वाळते. या रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळा संपण्याच्या आणि पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास विशेष जाणवतो. या रोगावर पुढीलप्रमाणे उपाय योजना करावी.

बोडोमिश्रणाच्या फवारण्या…

झाडावर रोग होऊ नये म्हणून 1 टक्का बोडो मिश्रणाच्या वर्षातून फवारण्या कराव्यात. रोगाचा प्रादुर्भाव झालेली पाने आणि वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. डायबॅक झालेल्या झाडांच्या आळ्यात वयोमानानुसार 5 ते 10 मिटर पाण्यात 1 टक्का बोर्डोमिश्रण ओतावे आणि 15 दिवसाच्या अंतराने 1 टक्का बोडोमिश्रणाच्या तीन फवारण्या कराव्यात. ज्यावेळी पानास नवीन पालवी येते त्यावेळी पाने खाणार्‍या अळीचा उपद्रव आढळून येतो. कोरड्या हंगामात या किडीचा उपद्रव अधिक होतो. त्यामुळे नवीन पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी. या झाडावर खोडअळीचाही प्रादुर्भाव होतो. अखंड काळ्या रंगाची ही पिवळट पट्टे असलेली केसाळ अळी फांद्या तसेच खोडांना भोके पाडत आत शिरते. त्यामुळे फांद्या आणि झाडे वाळतात.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ऊस शेती – योग्य बियाणांची निवड – तानाजी मोरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news