अफगाणिस्तान : काबूलचे सामूहिक हत्याकांड | पुढारी

अफगाणिस्तान : काबूलचे सामूहिक हत्याकांड

अफगाणिस्तान राजधानी काबूलच्या विमानतळावर गुरुवारी झालेल्या तीन बॉम्बस्फोटांत शंभराहून अधिक माणसे मारली गेली. शेकडो जबर जखमी झाली. त्यापैकी मृतांचा विषय सोडून देऊ. कारण, त्यांना या मर्त्य जगापासूनच मुक्‍ती मिळालेली आहे. त्यामुळे मातीनेच आकार घेतलेल्या देहाची काय विटंबना होत असेल, ते बघायला ते हयात नाहीत; पण ज्यांना अर्धवट मारल्यासारखे जखमी अवस्थेत याच जगात त्या स्फोटांनी जिवंत ठेवलेले आहे, त्यांच्या शारीरिक व मानसिक यातनांचे काय? त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपाय व उपचार होण्यासारखी परिस्थिती तरी अफगाण भूमीत आज आहे काय? आणि नसेल, तर त्याला जबाबदार कोण? या प्रश्नांची उत्तरे कोणापाशी तरी आहेत काय? कारण, त्यापैकी कोणाही निरपराध, निष्पापाने अशी परिस्थिती निर्माण केलेली नाही वा त्यासाठी प्रयत्नही केलेले नसावेत. आपण या पृथ्वीतलावर जन्म घेतलाय, तर जमेल तितके सुखाचे व सुसह्य जीवन जगावे, इतकीच त्यांची आशा, अपेक्षा व आकांक्षा असावी; पण जे कोणी विविध विचारधारा वा राजकीय, सामाजिक भूमिकांची हत्यारे घेऊन जगावर नियंत्रण करू बघतात, त्यांच्या महत्त्वाकांक्षा व अपेक्षांसाठी त्या निरपराधांना बळी पडावे लागलेले आहे. त्या पापात जितका तालिबान्यांचा समावेश आहे, तितकाच अमेरिकेचाही. जितके हे पाप अमेरिकेसारख्या सर्व महाशक्‍तींचे आहे, तितकीच त्या पापाची जबाबदारी उदात्त भाषा बोलणार्‍या राष्ट्रसंघ, अ‍ॅम्नेस्टी व मानवाधिकाराचे झेंडे फडकविणार्‍यांची आहे. कारण, आज अफगाणिस्तानात जे अराजक माजले आहे, त्याला जगभरचे असले एकाहून एक विद्वान व अभ्यासक मुत्सद्दीसारखेच कारणीभूत ठरले आहेत. प्रामुख्याने दीड-दोन वर्षांपूर्वी अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे राजकारण जगातून खेळले गेले होते, त्याचाच हा परिपाक नाही काय? डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जे जागतिक राजकारण झाले, त्यातूनच ज्यो बायडेन अध्यक्ष झाले. आता अफगाणिस्तानात जे काही चालले आहे, ते ट्रम्प अध्यक्ष असते, तर घडले असते काय, याचाही विचार आवश्यक आहे. ट्रम्प यांच्यावर कितीही आडमुठा वा धसमुसळा नेता असल्याचा आरोप झाला, तरी त्यांनी चार वर्षांत जितकी भयावह जागतिक समस्या उभी केली नाही, त्यापेक्षा भयंकर स्थिती आता बायडेन यांनी अवघ्या आठ महिन्यांत जगासमोर आणून ठेवलेली आहे. त्यांच्याच अलीकडल्या घाईगर्दीच्या निर्णयांनी व धोरणांनी बघता-बघता अफगाण भूमी तालिबान्यांच्या हाती गेली असून तिथे अकस्मात अराजकाची परिस्थिती आणली. थोडक्यात, बायडेन व त्यांच्या प्रशासनानेच हजारो विदेशी नागरिक व लाखो अफगाणांना मृत्यूच्या खाईत लोटून दिलेले आहे. अफगाणिस्तानला जणू दारूगोळ्याच्या धुमसणार्‍या कोठारात डांबून टाकलेले आहे. मग, गुरुवारच्या घातपाताला बायडेन नाही, तर अन्य कोणाला जबाबदार धरता येईल?

तसे बघायला गेल्यास आयसिस या जिहादी संघटनेने गुरुवारच्या तिन्ही स्फोटांची जबाबदारी उचलली आहे. परंतु, अशा घातपाताच्या योजनेला कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक व पोषक असलेली परिस्थिती निर्माण करणे त्यांना शक्य नव्हते. बायडेन प्रशासनाच्या सावळ्या गोंधळाने ती स्थिती निर्माण करून ठेवली. दोहामध्ये तालिबान्यांशी दीर्घकाळ संवाद, विचारविनिमय चाललेला असताना त्यात काही निश्‍चित झालेले नव्हते. इतक्यातच बायडेन यांनी 31 ऑगस्टपूर्वी शेवटचा अमेरिकन सैनिक अफगाण भूमीतून बाहेर पडेल, असे घोषित करून टाकले. तशा हालचालीही सुरू झाल्या; पण नुसते सैनिक बाहेर काढून भागणार नव्हते. अमेरिकेसहीत विविध देशांचे नागरिक, व्यावसायिक अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर विसंबून अफगाणिस्तानात कार्यरत होते. त्याखेरीज अमेरिकन सेनेला आवश्यक असलेली यंत्र सामग्री व युद्ध साहित्याचा प्रचंड साठा तिथे होता. तो हलवला नाही, तर बेताल व हिंस्र तालिबान्यांच्या हाती जणू सार्वत्रिक कत्तलीची साधनेच पुरवली जातील, एवढेही भान बायडेन यांच्या सहकार्‍यांना राखता आले नाही. परिणामी, बघता-बघता तालिबानी घातपाती जिहादी काबूलपर्यंत पोहोचले आणि आता त्यांच्यापाशी सार्वत्रिक विनाश घडवून आणायला पुरेशी स्फोटक सामग्री पडलेली आहे. अमेरिकन सैनिक तिथून निघण्यापूर्वीच त्याच्याच बळावर तिथे सत्तेत बसलेल्या अश्रफ गनी नावाच्या राष्ट्राध्यक्षाने देश सोडून पोबारा केला. जेव्हा असे काही घडते तेव्हा सामान्य लोकांचा धीर सुटत असतो आणि जीव मुठीत धरून सामान्य माणसे सैरावैरा पळू लागतात. तशी स्थिती बायडेन यांनी निर्माण केली. आज इतकेच म्हणता येईल की, जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानात अमेरिकन सेनेला पाठवून तालिबान्यांची पकड खिळखिळी करून टाकली होती. बायडेन यांनी मागल्या सात महिन्यांत त्याच हिंस्र तालिबान्यांना अधिक सुसज्ज व मारक बनवून ठेवले. अमेरिकन सरकारी धोरणावर विसंबून तिथे कामासाठी गेलेल्या विदेशी वा तिथल्याच स्थानिक नागरिकांना बायडेन सरकारने मृत्यूच्या जबड्यात ढकलून दिलेे. पुढे स्फोट वा गोळीबार तालिबान्यांनी केला वा आयसिसच्या जिहादींनी केला, या तपशीलाला अर्थ नाही. बेजबाबदार वा कर्तृत्वहीन नेता देशाच्या वा समाजाच्या माथी येऊन बसला, मग कसा मानवतेला रसातळाला घेऊन जातो, त्याचे जिवंत उदाहरण म्हणून बायडेन यांच्याकडे बोट दाखवला येईल; पण दोष त्यांच्यापुरता थांबणार नाही. त्या नाकर्त्या व गलितगात्र माणसाला अध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी ज्या मतदारांसह जगभरच्या बुद्धिमंतांनी आपली शक्‍ती व बुद्धी पणाला लावली, तो प्रत्येक जण गुरुवारी झालेल्या अफगाणी सार्वत्रिक कत्तलीला सारखाच जबाबदार गुन्हेगार मानला पाहिजे.

Back to top button