महाराष्ट्र : ७७% पीकक्षेत्र धोक्यात! | पुढारी

महाराष्ट्र : ७७% पीकक्षेत्र धोक्यात!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : हवामानातील तीव्र चढ-उतार, दुष्काळ आणि क्षीण झालेली जलसुरक्षा यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील एकूण 11 जिल्हे शेतीसाठी सर्वाधिक धोकादायक झाले असून राज्यातील 77 टक्के पिकक्षेत्र धोक्यात आल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारच्या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून निघाला आहे.

शेतीच्या दृष्टीने 11 जिल्ह्यांमध्ये राज्याचे 40 टक्के पीकक्षेत्र आहे. 37 टक्के पीकक्षेत्र असलेले 14 जिल्हे मध्यम स्वरूपात आघातप्रवण झाले आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास तीन चतुर्थांश पीकक्षेत्र हे वातावरणीय बदलामुळे आघातप्रवण असल्याचे दिसून येते.

राज्यात अनेक ठिकाणी येणारे पूर आणि हवामानातील तीव्र घटनांचा फटका शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसत असून, वातावरणीय बदलांमुळे भविष्यात होणारा धोका या अभ्यासातून अधोरेखित झाला आहे.

‘सोशिओ-इकॉनॉमिक व्हल्नरेबिलिटी टू क्लायमेट चेंजइंडेक्स डेव्हलपमेन्ट अँड मॅपिंग फॉर डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र’या संशोधनातून कमालीच्या वातावरणीय परिस्थितीमुळे शेतीआधारित अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ अग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) आणि नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट (एनडीआरआय)मधील चैतन्य आढाव यांनी आयसीएआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बार्ली रिसर्च, कर्नालचे डॉ. आर. सेंधिल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या अभ्यासातून महाराष्ट्रातील कृषी संकटावर प्रकाश टाकला आहे.

या अभ्यासानुसार उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा हा चक्रीवादळे, पूर, पावसाचे बदलते पॅटर्न आणि तीव्र तापमानामुळे पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली, विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती आणि वाशिम हे इतर दहा जिल्हे अधिक प्रमाणात आघातप्रवण, संवेदनशील असल्याचे, चैतन्य आढाव यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र मधील धुळे, जळगाव, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे इतर 14 जिल्हेदेखील मध्यमस्वरुपात आघातप्रवण असल्याचे हा अभ्यास दर्शवितो. या जिल्ह्यांतील ज्वारी, तांदूळ, गहू, ऊस, कापूस, नाचणी, काजू, बार्ली आणि बाजरी या पिकांना वातावरणातील संकटांचा सर्वाधिक फटका सहन करावा लागू शकतो.

Back to top button