‘व्हीएसआय’च्या ऊस वाणाचा नऊ राज्यांत डंका

‘व्हीएसआय’च्या ऊस वाणाचा नऊ राज्यांत डंका
Published on
Updated on

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या व्हीएसआय 12121 (व्हीएसआय 08005)

पुणे : जास्त साखर उतारा देणारा, पाण्याचा ताण सहन करणारा, अधिक फायबर असलेला, अनेक खोडवा पीक देणारा, चांगला वाढणारा आणि मध्यम तसेच उशिरा पक्व होणार्‍या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या व्हीएसआय 12121 (व्हीएसआय 08005) या ऊस वाणास दक्षिण भारतातील नऊ राज्यांमध्ये प्रसारित करण्यास केंद्रीय बियाणे समितीने 28 जुलै रोजी मान्यता दिली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेकडून ऊस वाण संशोधनाचे काम सुरू आहे. व्हीएसआय 12121 (म्हणजेच व्हीएसआय 08005) ही ऊस जात महाराष्ट्रात प्रसारित करण्यास बियाणे उपसमितीने 2018 मध्ये मान्यता दिली होती. आता हा वाण महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, आंध— प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांत प्रसारित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, व्हीएसआयच्या संशोधनकार्यात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. व्हीएसआयच्या प्रक्षेत्रावर चाचण्या घेताना या ऊस वाणाचे मूळ नाव व्हीएसआय 08005 असे आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखाने सध्या उपलब्ध असलेल्या को 86032, कोएम 0265, कोसी 671 या प्रमुख जातींवरच अवलंबून होते. केंद्र सरकारच्या मदतीने आंबोली येथील ऊस प्रजनन केंद्रातून पहिला उसाचा वाण व्हीएसआय 12121 संकर पद्धतीने को 0310 हा मादी वाण व को 86011 या नर वाणापासून करण्यात आल्याची माहिती व्हीएसआयचे मुख्य शास्त्रज्ञ व ऊस प्रजनन विभागाचे प्रमुख डॉ. रमेश हापसे यांनी दिली.

अखिल भारतीय ऊस संशोधन चाचण्यांमध्ये दक्षिण भारतातील एकूण 18 संशोधन केंद्रांच्या चाचण्यांमध्ये (दोन लागवडी व एक खोडवा पीक) ऊस उत्पादन, साखर उत्पादन, साखर उतारा याबाबतीत इतर तुल्य वाणांपेक्षा ही ऊस जात सर्वश्रेष्ठ ठरली आहे. या चाचण्यांमध्ये 12121 जातीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी 124.70 टन, तसेच साखर उत्पादन 18.22 टन इतके मिळाले. दक्षिण भारतातील सर्व चाचण्यांमध्ये हे उत्पादन तुल्य वाणांपेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी जास्त मिळते.

12121 या जातीमध्ये सरासरी रसातील साखरेचे प्रमाण 20.07 टक्के मिळाले. याचा उपयोग सर्वात जास्त साखर उतारा मिळण्यासाठी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

'रेड रॉट' रोगास बळी पडत नाही…

दक्षिण भारतातील उसावरील प्रमुख रोग म्हणजे 'रेड रॉट' (ऊस लाल रंगणे) या रोगास 12121 ही जात बळी पडत नाही. काणी व गवताळ वाढ या रोगास मध्यम प्रतिकारक आहे. या ऊस जातीमध्ये चोथ्याचे प्रमाण थोडे जास्त असल्याने रानडुक्कर, कोल्हे, उंदीर, घुशी या ऊस पिकास नुकसान करीत नाहीत. उसामध्ये दशीचे प्रमाण (आतून ऊस पोकळ पडणे) अजिबात नसते. ऊस जातीस तुरा येत नसल्याने ऊस लागवड तीनही हंगामांत केली तरी चालते. राज्यात सध्या या जातीखालील क्षेत्र एकूण ऊस क्षेत्राच्या 15 टक्के इतके असून प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात ते असल्याचे डॉ. हापसे यांनी सांगितले.

आंबोलीतील ऊस प्रजनन केंद्रावर चाचण्या

व्हीएसआयने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे स्वतःचे ऊस प्रजनन केंद्र सुरू करून नवीन ऊस जाती निर्मितीचे काम जोमाने सुरू केले. व्हीएसआय 12121 या जातीच्या राष्ट्रीय स्तरावरील वाण प्रसारणात व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख व कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेचे माजी संचालक डॉ. टी. व्ही. श्रीनिवासन यांचा मोलाचा वाटा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news