कोरोना तिसरी लाट : धास्ती आणि वस्तुस्थिती | पुढारी

कोरोना तिसरी लाट : धास्ती आणि वस्तुस्थिती

- डॉ. राकेश मिश्रा (लेखक हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर आणि मोलीक्युलर बायोलॉजीचे संचालक आहेत.)

कोरोना संसर्गग्रस्त लोकांचे व्यवस्थित आयसोलेशन केले, तर नवा म्यूटंट धोकादायक असूनसुद्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा प्रकारे आपणच विषाणूवर हल्ला करणे आवश्यक असते. उत्परिवर्तन हे विषाणूचे सर्वांत मोठे शस्त्र आहे आणि तेच विकसित होऊ न देता त्याच्या क्षमतेचा मुकाबला करावा लागेल

भारतात सुमारे 10 टक्के लोकसंख्येचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे; परंतु सिरोप्रिव्हेलन्स सर्वेक्षणानुसार 68 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. तिसरी लाट आलीच तरी ती सौम्य असेल, असा याचा अर्थ होतो का? वस्तुतः तसे अपेक्षित आहे; परंतु ज्या 30 टक्के लोकसंख्येमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी तयार झालेली नाही आणि लसीकरणही झालेले नाही, ती संख्याही खूप मोठी आहे. त्या लोकसंख्येला संसर्ग होऊ नये, अशीच सर्वांची इच्छा असेल. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. कारण, संसर्ग अजूनही अस्तित्वात आहे. परंतु, तिला लाट म्हणण्यापेक्षा तो एक ‘तरंग’ असेल, अशी अपेक्षा आहे. ही लाट अधिक स्थानिक स्वरूपाची असण्याचीही शक्यता आहे.

मोठ्या संख्येने लोकांना लसीचे एक किंवा दोन डोस दिले आहेत आणि विशेषतः मोठ्या शहरांमध्ये लक्षणीय संख्येने लोकांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी दिसून आली. या दोन प्रमुख आधारांवर तिसरी लाट सौम्य करण्यास मदत होणार आहे. सिरोपॉझिटिव्हिटी ही लसीकरणाइतकी प्रभावी नसली, तरी संसर्ग बर्‍यापैकी दूर ठेवण्यास त्यामुळे मदत होते. आपल्याकडे संसर्गाची वारंवारिताही कमी दिसून येते, हे चांगले लक्षण आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करता असेही म्हणता येईल की, कदाचित तिसरी लाट आलीही असेल आणि जाणवली नसेल, इतकी ती लहान स्वरूपाची असेल.

तिसरी लाट किती मोठी असेल, हे तीन घटकांवर अवलंबून असणार आहे. आपण कोव्हिड नियमावलीचे व्यवस्थित पालन करणार की नाही, हा सर्वांत महत्त्वाचा घटक ठरेल. कारण, गर्दी म्हटल्यावर त्यात एखादी तरी असंरक्षित व्यक्‍ती असू शकते आणि त्या व्यक्‍तीमुळे विषाणूचा प्रसार होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे मोठ्या संख्येने चाचण्या सुरू ठेवल्या पाहिजेत आणि संसर्गग्रस्तांना आयसोलेट केले पाहिजे. विषाणूचा प्रसार रोखण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरतो. आपण चाचण्याच केल्या नाहीत, तर कोण संसर्गग्रस्त आहे आणि विषाणू कुठे पसरत आहे, हे कळणारच नाही. तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे लसीकरण. दररोज सुमारे एक कोटी लोकांचे लसीकरण झाले, तर आगामी काही महिन्यांत विषाणूचा प्रसार प्रभावीपणे रोखू शकू. आपण या तीन गोष्टींचे प्रभावीपणे पालन केले आणि लोकांनी सहकार्य केले, तर कदाचित आपल्याला तिसरी लाट येऊन गेलेलीही कळणार नाही.

परंतु, दोन गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्या नियंत्रणात नाहीत. एक म्हणजे, सिरोपॉझिटिव्हिटी किती काळ टिकते हे आपल्याला ठाऊक नाही. पहिल्या लाटेत संसर्गग्रस्त झालेल्या लोकांपैकी किती जणांच्या शरीरात अँटिबॉडीज अद्याप टिकून आहेत, हे आपल्याला माहीत नाही. जो दुसरा घटक आपल्या हातात नाही, तो आहे विषाणूचे उत्परिवर्तन. वस्तुतः काही प्रमाणात ते आपल्या हातात आहे, असेही म्हणता येईल. कारण, म्हणजे जेव्हा विषाणू लोकांना संसर्गग्रस्त करतो तेव्हाच विषाणूच्या संख्येचा आपल्या शरीरात गुणाकार होत जातो. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले लोक मोठ्या संख्येने असतील, तर ते विषाणूचे वाहक आहेतच आणि विषाणूला नवीन रूपे तयार करण्यासाठीही (उत्परिवर्तन) ते मदत करत आहेत. यातील काही व्हेरिएन्ट डेल्टापेक्षा धोकादायक असतील, तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

तूर्तास तरी डेल्टा किंवा डेल्टा प्लसपेक्षा अधिक धोकादायक व्हेरिएंट पाहायला मिळालेला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटही फार मोठ्या संख्येने अस्तित्वात नाही. डेल्टाचा प्रसार मात्र मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सध्याच्या संसर्गग्रस्तांपैकी 90 टक्के लोकांमध्ये हा व्हेरिएंट दिसतो. डेल्टा व्हेरिएंट हा अतिजलद संसर्ग पसरविणारा असला, तरी आता तो नियंत्रित करता येत आहे. वस्तुतः डेल्टापेक्षा भयावह प्रतिरूप तयार करणे विषाणूलाही फारसे सोपे नाही. तशी शक्यता फार कमी आहे. याचा अर्थ आता कोणत्याही नवीन व्हेरिएंटला मोठे अडथळे पार करूनच यावे लागेल. परंतु, जर सर्व रेस्टॉरंट्स, शाळा, सार्वजनिक वाहतूक सुरू करून विषाणूला आव्हानच दिले आणि मास्क वापरणे बंद केले, तर नवीन उत्परिवर्तनाचा प्रयत्न विषाणू नक्‍की करेल. नवीन प्रतिरूप हे डेल्टापेक्षा अधिक धोकादायक असू शकेल आणि मग आपल्याला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.

जेव्हा मोठ्या लोकसंख्येला संसर्ग होतो, तेव्हाच उत्परिवर्तनाचा धोका अधिक असतो. विविध प्रतिरूपांपैकी एक किंवा दोन व्हेरिएंट अधिक घातक असू शकतील. जेव्हा एखादा व्हेरिएंट मोठ्या लोकसंख्येला बाधित करू शकत नाही, तेव्हा तो कालांतराने संपून जातो. उदाहरणार्थ, एखाद्या धोकादायक व्हेरिएंटने काही लोकांनाच संसर्गग्रस्त केले आणि त्या लोकांचे व्यवस्थित आयसोलेशन केले, तर नवा म्यूटंट धोकादायक असूनसुद्धा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि आयसोलेट केलेल्या लोकांपुरताच मर्यादित राहील. अशा प्रकारे आपणच विषाणूवर हल्ला करणे आवश्यक असते. उत्परिवर्तन हे त्याचे सर्वांत मोठे शस्त्र आहे आणि तेच विकसित होऊ न देता आपल्याला त्याच्या क्षमतेचा मुकाबला करावा लागेल.

चाचण्या आणि विलगीकरण (आयसोलेशन) ही विषाणूविरुद्धची मोठी दोन शस्त्रे व्यवस्थित वापरली, तर आपण विषाणूचे योग्य व्यवस्थापन करू शकू. आता आपल्याला विषाणूबाबतची अधिक माहिती आहे आणि सुविधाही आहेत. त्यामुळेच दुसर्‍या लाटेसारखी मोठी आपत्ती पुन्हा येण्याची चिन्हे फारशी नाहीत. परंतु, नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग आणि निष्काळजीपणे बाहेर न फिरणे यात थोडीही हयगय करून चालणार नाही. तिसरी लाट मोठी आल्यास आरोग्यविषयक समस्यांबरोबरच आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर होईल. रोजगार गेल्याने गरिबांना आधीच खूप त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच, विषाणूच्या धोक्याविषयी नागरिकांनी जागरुक असलेच पाहिजे आणि त्याला विनाकारण पसरण्याची संधीच आपण देता कामा नये

Back to top button