घडामोडी वाढल्या; शिवसेना आमदार राज्यपालांना भेटणार! | पुढारी

घडामोडी वाढल्या; शिवसेना आमदार राज्यपालांना भेटणार!

मुंबई : पुढारी ऑनलाईन

राज्यातील सत्ता स्थापनेचा मार्ग अधिक खडतर होत चालल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने आपली भूमिका मवाळ केली आहे, असे वाटत असतानाच पुन्हा परस्थिती बदलली आहे.  शिवसेना भवनात आज (ता.३१) नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत शिवसेना गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली.

या बैठकीनंतर खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रांगणात आल्यानंतर माध्यमांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणतीच माहिती दिली आहे. राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असल्याने शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शिवसेना आमदार राज्यपालांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राज्यपालांनी स्वतः पाहणी करून तत्काळ नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी करणार असल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांचे नाव घेऊन राज्यपालांची भेट होणार असली भाजपवर दबाव वाढवण्याचा एक भाग आहे का? अशीही विचारणा केली जात आहे. 

शिवसेना विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व आमदारांनी त्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे शिंदे हेच शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहिले आहेत. तर सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. 

 

Back to top button