उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात | पुढारी | पुढारी

उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात | पुढारी

नवी दिल्ली : पुढारी वृत्‍तसेवा 

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास शुक्रवारपासून सुरुवात होत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. यावेळी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन विरोधी पक्षांना सरकारकडून करण्यात आले. मात्र नागरिकता विधेयक, आर्थिक मंदीसह इतर मुद्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केलेला आहे. 

अधिक वाचा : ‘गोडसेची विचारधारा मानतात, पण पीएम मोदींना सांगण्याची हिंमत नाही’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाद्वारे अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. अभिभाषणानंतर सरकारकडून संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. 

अधिक वाचा : निर्भयाच्या मारेकऱ्यांची शेवटची ‘फडफड’ सुरुच; आता केली नवीन मागणी

देशाच्या आर्थिक विकासाचा लेखाजोखा आर्थिक पाहणी अहवालाद्वारे मांडला जातो. अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्‍लागार आणि त्यांचे सहकारी आर्थिक पाहणी अहवाल तयार करत असतात. यावेळचा अहवाल मुख्य आर्थिक सल्‍लागार के. सुब्रम्हण्यम यांनी तयार केलेला आहे. 1 फेबु्रवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आर्थिक मंदीतून देशाला बाहेर काढण्यासाठी सीतारामन अर्थसंकल्पात काय उपाययोजना करणार, याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले आहे. गतवर्षी 5 जुलै रोजी सीतारामन यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. 

अधिक वाचा : चीनमध्ये कोरोनाचा ‘कहर’; २४ तासांत ३८ मृत्यू

संसदेच्या गत अधिवेशनात केंद्र सरकारने नागरिकता कायदा मंजूर करुन घेतला होता. नागरिकता कायद्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांचा तीव्र विरोध असून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन याच मुद्यावरुन गाजण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदीचा विळखा वाढत चालल्याने हा मुद्दाही विरोधकांच्या हाती आयता कोलितासारखा आला आहे. अधिवेशनात आपली रणनीती ठरविण्यासाठी 1 तारखेला विरोधी पक्षांनी बैठकीचे आयोजन केलेले आहे. अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आज पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीस अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, तृणमूलचे सुदीप बंडोपाध्याय तसेच विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. 

Back to top button