Dilip Walse Patil : दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन, एटीएसची संपूर्ण घटनेवर नजर!

Dilip Walse Patil
Dilip Walse Patil
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी घातपात घडवण्याचा पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवादी कट मंगळवारी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने उधळून लावला होता. मुंबईत धारावीत राहणार्‍या जान मोहम्मद शेख याच्यासह राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या एका दहशतवाद्यांचं मुंबई कनेक्शन समोर आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांची मुंबई पोलिस आयुक्त, एटीएस प्रमुख यांच्यासोबत बैठक झाली.

दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात संपूर्ण माहिती आली नसल्याचे सांगत अधिक माहिती देणे वळसे पाटील यांनी टाळले. पण आज दुपारी ३ वाजता एटीएस प्रमुख पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एटीएसची संपूर्ण घटनेवर नजर आहे. जोपर्यंत संपूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत माहिती देऊ शकत नाही. ही घटना राज्य सरकार गंभीरपणे घेत आहे. गणेशोत्सव काळात सुरक्षेसंदर्भात काळजी घेतली जात आहेत. पोलिसांत राजकीय हस्तक्षेप नाही. पोलिस राज्यात त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. पोलिसांना त्यांच्या पद्धतीने काम करु दिलं पाहिजे, असे दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ओसामा, झिशान कमर, मोहम्मद अबू बकर, जान मोहम्मद शेख, मोहम्मद आमिर जावेद आणि मूलचंद लाला अशी या अटक करण्यात आलेल्या पाक प्रशिक्षित दहशतवाद्यांची नावे आहेत.

दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात नवरात्री, रामलीला दरम्यान गर्दीच्या ठिकाणी या दहशतवादी संघटनेचा स्फोट घडवण्याचा कट होता. पाकची पाताळयंत्री गुप्तहेर संघटना आयएसआयने या घातपाताची जबाबदारी अनिस इब्राहीमवर सोपवली होती. या सर्वांना अनिस थेट प्रशिक्षण देत होता. या अतिरेक्यांपैकी ओसामा आणि झिशान या दोघांनी याच वर्षी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आणि भारतात परतल्यापासून त्यांना सतत आयएसआयकडून सूचना येत होत्या. अत्यंत शक्तिशाली आयईडी स्फोटके पेरण्यासाठी ठिकाणे निवडण्यास त्यांना सांगण्यात आले होते.

दाऊदच्या इशार्‍यावर महाराष्ट्रासह देशभरात घातपात घडवण्यास निघालेल्या सहा पैकी एक जान मोहम्मद शेख ऊर्फ समीर कालिया हा 47 वर्षीय अतिरेकी अंडरवर्ल्डचा हस्तक म्हणून ओळखला जातो. धारावीतील केलाबखरमध्ये तो लहानाचा मोठा झाला.

काही वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचे निधन झाले. पत्नी आणि एक 22 वर्ष आणि एक 11 वर्षाच्या मुलीसह तो इथे राहतो.तो चालक म्हणून काम करत असे. स्वत: कमी शिकलेला पण त्याच्या दोन्ही मुली शिक्षण घेत होत्या.पत्नी हाताला मिळेल ते काम करते. काही रहिवाश्यांनी त्याला सोमवारी दुपारी देखील घराच्या परिसरात पाहिले होते.

मंगळवारी त्याला अटक होताच सर्वांनाच धक्का बसला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : चला पाहूया आदेश बांदेकरांच्या घरचा गणपती | Ganesh Festivel Special

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news