हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप तथ्यहीन; #जावेद अख्तर यांनी घेतला समाचार

हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप तथ्यहीन; #जावेद अख्तर यांनी घेतला समाचार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईनडेस्क : आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन देणारे तालिबान आहेत, असे गंभीर वक्तव्य करणाऱ्या गीतकार #जावेद अख्तर यांनी मौन सोडले आहे. सामना या दैनिकातून त्यांनी लेख लिहित याप्रकरणी टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे.

ते म्हणतात, 'मी जेव्हा ३ सप्टेंबर २०२१ रोजी 'एनडीटीव्ही' वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील.

एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे.

मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे.

प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे.'

#जावेद अख्तर पुढे म्हणाले, 'माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही.

त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे.

मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.

कारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावे. '

मला धर्मांधाकडून धोका असल्याने संरक्षण

' वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते.

पहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होता.

त्याशिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी (एमएसडी) नावाच्या संस्थेसह हैदराबाद, अलाहाबाद, कानपूर आणि अलिगढ यांसारख्या हिंदुस्थानातील अनेक शहरांचा दौरा केला होता.

अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळय़ांचा परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या, असेही #जावेद अख्तर म्हणाले.

ते  म्हणाले, बईमधील एका उर्दू वृत्तपत्रात त्या ठळकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या. ही २००७ मधील घटना आहे.

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांनी त्यावेळी त्या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक यांना प्रत्यक्ष बोलावून घेतले आणि इशारा दिला की, जर नंतर कोणतेही हिंसक कृत्य घडले तर त्यासाठी मुंबई पोलीस या वृत्तपत्राला जबाबदार धरतील २०१० मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहे,'

माझ्यावरील आरोप हास्यास्पद

'काहींनी माझ्यावर तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे. यापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही.

आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे.

या वादग्रस्त मुलाखतीच्या एका आठवडय़ापूर्वी २४ ऑगस्ट, २०२१ रोजी मी एक ट्विट केले होते.

त्यात म्हटले हाोते, 'मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या दोन सदस्यांनी रानटी तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळविल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला आहे हे धक्कादायक आहे.

जरी बोर्डाने त्यापासून अंतर राखले असले तरी तेवढे पुरेसे नाही. बोर्डाने त्यांचे मत अत्यंत निःसंदिग्ध शब्दांत व्यक्त केले पाहिजे.

मी येथे माझ्या या मतांचा पुनरुच्चार करतो आहे.

कारण मला हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मी मुस्लिम समुदायातील प्रतिगामी चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात उभा राहत नाही या खोटय़ा सबबीमागे लपू द्यायचे नाही.

त्यांनी माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही.'

हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही

'खरे तर नुकत्याच एका मुलाखतीत मी म्हटले होते की, 'हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे.

हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही.

कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे.

मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत?

याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे.

प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे.'

तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीत बरेच साम्य

'तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते.

याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे.

तालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे. हिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे.

तालिबानला स्त्रियांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचे आहे.

हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रिया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेले आवडत नाही, हे स्पष्ट केले आहे.

उत्तर प्रदेश, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांत रेस्टॉरंट, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यामुळे तरुण-तरुणींना निर्दयपणे मारहाण केली.

मुस्लिम धर्मांधांप्रमाणेच हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रियांचा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार मान्य नाही.

तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत.

त्याचप्रमाणे हिंदू उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्याकांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत हे वेळोवेळी त्यांच्या भाषणांमधून आणि घोषणांमधून आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांच्या कृत्यांमधून स्पष्ट केले आहे.' असे #जावेद अख्तर म्हणाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news