मिरजेतील व्यापार्‍याला दुबईतील कंपनीचा २ कोटी ८० लाखांना गंडा | पुढारी

मिरजेतील व्यापार्‍याला दुबईतील कंपनीचा २ कोटी ८० लाखांना गंडा

मिरज : पुढारी वृत्तसेवा

दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ  ट्रेडिंग एल.एल या कंपनीने येथील एका द्राक्ष व्यापार्‍याला 2 कोटी 80 लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पांडुरंग जगताप यांनी कंपनीविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे.

जगताप यांची द्राक्ष निर्यात करणारी ऑल एशिया इम्पोर्ट अँड एक्स्पोर्ट या नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून जगताप  गेल्या दहा वर्षांपासून फळे, भाजी, ड्रायफ्रूट  निर्यात करतात. यासंदर्भात त्यांची वेबसाईट देखील आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून दुबईमधील कंपनीचे व्यवस्थापक सुबिध आणि आनंद देसाई या दोघांनी जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी डिसेंबर व जानेवारी 2021 मध्ये द्राक्ष खरेदीबाबत बोलणी केली. त्यानंतर जगताप यांना ई-मेलने  खरेदीची ऑर्डर दिली. 

जगताप यांनी जिल्ह्यातील सावर्डे, सावळज, नागठाणे, जत, बिळूर येथील शेतकर्‍यांची निर्यात करण्याच्या दर्जाची  द्राक्षे जहाजाने दुबईला पाठविली. त्यानंतर सुबिध व देसाई यांनी बिल स्कॅन कॉपीच्या आधारे 30 टक्के रक्कम व उरलेली 70 टक्के रक्कम देणार असल्याचे सांगितले होते. सुबिध व देसाई यांनी द्राक्षाचे तीन कंटेनर दुबईत पोहोचल्यानंतर तीन टप्प्यात 25 लाख रुपये मार्च महिन्यात पाठविले. ही रक्कम मिळेपर्यंत आणखी 12 कंटेनर जगताप यांच्याकडून मागवण्यात आले.

त्यानंतर जगताप यांनी राहिलेल्या रक्कमेची मागणी केली. त्यावेळी सुबिध व देसाई यांनी मार्चअखेर रक्कम देतो असे सांगितले. जगताप यांनी पाठविलेली 15 कंटेनरच्या 3 कोटी 5 लाख बिलापैकी 2 कोटी 80 लाख रुपये बाकी अद्याप दिलेली नाही. 

द्राक्ष बागायतदारांना  पैसे द्यायचे असल्याने जगताप यांनी सुबिध व देसाई यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर दि. 11 एप्रिलपासून फोन बंद केले. 

दुबईतील  कंपनीचे सुबिध व देसाई यांनी विश्वास संपादन करुन 2 कोटी 80 लाखांची फसवणूक केली आहे, असे जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

 

Back to top button