

तासगाव : ढवळी (ता. तासगाव) येथे नववधूने लग्नाच्या पहिल्याच रात्री धूम ठोकली. त्यामुळे लग्न लावून देऊन नवरदेवाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी तासगाव पोलिसांत पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ अशोक चव्हाण (वय 35, रा. ढवळी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांत माणिकराव रंगनाथ पारधे, मुलगी निकिता सखाराम गोळे, निकिताची आई शोभा सखाराम गोळे, निकिताची मानलेली बहीण पूजा विजय माने (सर्व रा. नांदगाव, पांढरी, ता. जि. परभणी) व निकिता हिची मावशी (नाव, गाव माहिती नाही) यांचा समावेश आहे.
फिर्यादी सोमनाथ याचे भाऊ हे परभणी भागात ऊसतोड मजूर आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची वधू-वर सूचक केंद्राचा प्रमुख संशयित माणिकराव पारधे याच्याशी ओळख झाली. त्याने सोमनाथ याच्या लग्नाबद्दल माणिकराव यांना माहिती दिली असता, सोमनाथ याच्यासाठी निकिता हिचा फोटो दाखविला. सोमनाथ याने ही निकिता ही पसंत असल्याचे सांगितले.
4 सप्टेंबर रोजी संशयित सर्वजण लग्नाची बोलणी करण्यासाठी ढवळी येथे आले. दोन्ही बाजूकडून लग्नास पसंती देऊन होकार ठरविण्यात आला. मात्र त्यावेळी नववधू निकिता हिची आई शोभा हिने लग्न करण्यासाठी वर पक्षाकडून पाच लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. तडजोड होऊन वधूकडील मंडळींना अडीच लाख रुपये देण्याचे मान्य केले. ठरल्याप्रमाणे वराकडून वधूची आई शोभा हिला रोख अडीच लाख रुपये देण्यात आले. यावेळी या घटनेचा व्हिडीओ व फोटो काढण्यात आले.
वधूकडील मंडळींना रोख रक्कम दिल्यानंतर दुसर्या दिवशी, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता ठरल्याप्रमाणे विवाहसोहळा (यादी पे शादी) पार पडला. रीतीरिवाजाप्रमाणे नववधूला लग्न सोहळ्यावेळी मणीमंगळसूत्र, पैंजण व जोडवी हे सौभाग्य अलंकार देण्यात आले होते. दुपारी जेवणानंतर नववधूची आई शोभा, संशयित माणिकराव, मावशी हे त्यांच्या गावी निघून गेले.
यावेळी नववधू व तिची पाठराखण करणारी पूजा या लग्नघरी राहिल्या. रात्री जेवण आटोपून सर्वजण झोपले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नववधू व तिची पाठराखण करणारी पूजा या बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर आल्या. त्याचवेळी फिर्यादी सोमनाथ याची आई घराबाहेर आली असता, निकिता व पूजा या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे दिसून आले. सोमनाथ याच्या आईने आरडाओरड केली असता, घरातील सर्वजण बाहेर आले, पण तोपर्यंत निकिता व पूजा या पसार झाल्या होत्या. सर्वत्र शोधाशोध केली, पण त्या सापडल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमनाथ यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.