

सांगली : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींची मतमोजणी रविवार 21 रोजी होत असून, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आठही पालिकांच्या मतमोजणीसाठी 746 अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण शंभर टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. एकूण दोन ते सहा मतमोजणीच्या फेर्या होत असून, प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत.
जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या सहा नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या दोन नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबररोजी मतदान घेण्यात आले. नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी 41, तर नगरसेवकपदाच्या 180 जागांसाठी 590 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिराळा येथील प्रभाग चारमधील निवडणूकसंदर्भातील वाद निर्माण झाल्यामुळे ती स्थगित करण्यात आली.
यासाठी आता शनिवार, दि. 20 डिसेंबररोजी मतदान घेण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहेत. एकूण 2 लाख 57 हजार 977 मतदारांपैकी प्रत्यक्षात 1 लाख 95 हजार 952 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला.
मतदानाची टक्केवारी 75.96 टक्के इतकी आहे. आता मतमोजणीसाठी 746 अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्या 27 होणार असून, दोन ते सहा फेर्यांत मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी 100 टेबल मांडण्यात आले असून, आतापर्यंत 104 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यासाठी सहा टेबल ठेवण्यात आले आहेत.