

आटपाडी : लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून दोन कुटुंबांची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार आटपाडी तालुक्यात उघडकीस आला. सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत, आरोपींनी विश्वास संपादन केला आणि नंतर पोबारा केला. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनाजी शिवाजी कदम (वय 60, शेती व्यवसाय, रा. कौठुळी, ता. आटपाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून 18 ते 20 मार्च 2025 दरम्यान कौठुळी, दिघंची तसेच शितलादेवी मंदिर, बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे हा फसवणुकीचा प्रकार घडला.
धनाजी भीमराव शिंदे (रा. घाटनांद्रे, ता. कवठेमहांकाळ) व पोलू शंकर गिरी (रा. शेनीदेळुप, ता. अर्धापूर, जि. नांदेड) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलासाठी योग्य मुलगी शोधून लग्न लावून देतो, असे सांगितले. पोलू गिरीच्या मदतीने ‘आरती’ नावाच्या तरुणीला शितलादेवी मंदिर, बारड येथे आणण्यात आले. तेथे सुपारी फोडून लग्न ठरल्याचा देखावा उभा करत फिर्यादीकडून 2 लाख 50 हजार रुपये रोख घेतले. मात्र लग्न होण्यापूर्वीच ही तरुणी दिघंची येथून अचानक निघून गेली.
संशय बळावल्यानंतर चौकशी केली असता, असाच प्रकार फिर्यादीचे पाहुणे दत्तात्रय सुभाष काशीद यांच्याबाबतही झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी त्यांच्याकडूनही लग्न लावल्याचा भास निर्माण करून 2 लाख 50 हजार रुपये उकळले होते. मात्र संबंधित मुलगी अवघ्या 30 ते 40 दिवसातच सासर सोडून पसार झाली होती.
फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच धनाजी कदम यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चौकशीअंती व उपविभागीय पोलिस अधिकारी, विटा यांच्या लेखी परवानगीने 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आरोपींच्या शोधासाठी आटपाडी पोलिस तपास करीत आहेत.