सीमाभागातील ‘मराठीपण’ टिकवणार कसे ? | पुढारी

सीमाभागातील ‘मराठीपण' टिकवणार कसे ?

 ज्ञानेश्वर पाटील
सीमाभागात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही कानडी सरकारकडून राजरोस अन्याय सहन करावा लागत आहे. सीमाभागातील जनता महाराष्ट्रात जाण्यासाठी झगडत आहे. या सर्व वाटचालीत मराठी मातृभाषा दाबण्याचा जोरदार प्रयत्न होत आहे. एक काळ मराठीचे वैभव पाहिलेल्या सीमाभागात मराठीपण टिकून असले तरी मराठीवर घाला घालण्याची प्रवृत्ती घातक ठरत आहे. मुस्कटदाबीमुळे सीमाभागातील मराठीपण हरवत चाललेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

बेळगाव आणि सीमाभागात महाराष्ट्रीयन संस्कृतीचा प्रभाव आहे. सीमाप्रांत अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याने यथाकाल मराठी भाषिकांची कोंडी कशी करता येईल, यावर कानडी प्रशासनाचा भर राहिला आहे. मराठीबहुल भागाची आजची परिस्थिती काहीशी वेगळी दिसत आहे. कन्नडसक्तीमुळे मराठीच्या मोकळेपणावर मर्यादा येत आहेत. ७० वर्षापूर्वी सीमाभागातील मराठीची असलेली स्थिती आणि सध्याची परिस्थिती यात अंतर पडत चालले आहे. बेळगावच्या भूमीत तीन अखिल भारतीय साहित्य संमेलने अ. भा. नाट्य संमेलन झाली आहेत. त्या संमेलनातून प्रेरणा येऊन विविध भागात मराठी साहित्य संमेलनांची परंपरा सुरू झाली आहे. गायन, वादन, व्याख्यान, नाट्य सादरीकरण असे सांस्कृतिक कार्यक्रमही नियमित होत असतात. एकीकडे मराठीपण टिकवून ठेवण्यासाठी विविध संस्था आणि व्यवती धडपडत असल्या तरी इसरीकडे मराठीपण हरवत चालल्याची परिस्थिती अस्वस्थ करत आहे.

समाधानासाठी मराठीचा जागर

सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्राशी ज्या भावनिक सेतूने बांधले गेले आहेत त्यात मातृभाषेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातून येणारे राजकीय नेते, कलावंत, साहित्यिक मंडळींवर मराठी भाषिकांनी मन:पूर्वक प्रेम केले. कर्नाटकच्या वाहतूक विभागाने अवाजवी कर आकारणी सुरू केल्याने नाटकवाल्यांचे अर्थकारण बिघडले, याचे पर्यवसान महाराष्ट्रातील मराठी नाटकांचे बेळगावात होणारे प्रयोग बंद पडण्यावर झाला. कोरोनानंतरही ठिकठिकाणी साहित्य संमेलने होत असली तरी त्यात सीमाप्रश्न किंवा कानडी प्रशासनाकडून होणारा अन्याय संमेलनात चर्चिला जात नाही, सध्या सीमाप्रश्नाचा ठराव मांडणेही बंद करण्यात आले आहे. संमेलनाचे कार्य यशस्वीपणे सिद्धीस नेणे एवढाच मर्यादीत मतलब राहिला आहे. मनाच्या समाधानासाठी मराठीचा जागर होत असला तरी यातून नेमके काय साध्य झाले, हा खरा प्रश्न आहे. संमेलनातून प्रेरणा घेऊन किती हात मराठीत लिहिते झाले, यापा विचार होणेही आवश्यक आहे.

मराठीपणाला घरघर

मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने मराठी भाषिकच आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यम शाळांत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे, मराठी भाषिक शाळांची पटसंख्या पटत आहे. उत्सवाच्या माध्यमातून मराठीपण टिकून आहे. महाराष्ट्रातील
सण-उत्‍सवात दिसणाऱ्या प्रथा-परंपरा सीमाभागातही आहेत. आषाढी एकादशीला सीमाभागातील अनेक वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. चैत्र महिन्यात जोतिबा मंदिरातही भाविक मोठ्या संख्येने जातात. गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, विजयादशमी, दिवाळी, शिवजयंती आदी उत्सवात मराठी भाषिक मराठी संस्कृती जपतात. विविध उपक्रम राबवून मराठीपण जपण्याचा प्रयत्न करतात. उत्सवात मराठीपण दिसत असले तरी कर्नाटक सरकारच्या नियमावलीमुळे विशिष्ट चाकोरी निर्माण होत आहे. एखादा उत्सव आयोजित केला की तिथे कन्नड भाषेसा मजकूर किती आकारात आणि मराठीतील मजकूर किती आकारात हे ठरवून दिले जाते. नुकत्याच अन्नोत्सवात याची प्रचिती आली आहे. त्यामुळे, इच्छा नसूनही मराठीपण कुठेतरी हरवत चालल्याची सल मराठी बांधवांमध्ये आहे.

नवी पिढी द्वैभाषिक

नव्या पिंढीतील मुले कन्नडही शिकत असून, घरात मराठीसह कन्नडही बोलत असतात. अनेक कार्यकर्ते विविध पक्षात दाखल झाले आहेत. कन्नड भाषिकांशी ते कन्नड भाषेत संवाद साधतात, काळाच्या ओघात मराठी संस्कृती टिकवण्याचे आव्हान नव्या पिढीसमोर असणार आहे. सध्या तरी सीमालढ्यात महाराष्ट्राची अपेक्षित साथ मिळत नसल्याने आणि कर्नाटकी दबाव वाढत चालल्याने हरवत चाललेले मराठीपण टिकवणार कसे, हा गंभीर प्रश्न आहे.

हेही वाचा 

Back to top button