बेळगाव : कारची झाडाला धडक; राधानगरी तालुक्यातील मेकॅनिक ठार, ३ गंभीर जखमी | पुढारी

बेळगाव : कारची झाडाला धडक; राधानगरी तालुक्यातील मेकॅनिक ठार, ३ गंभीर जखमी

निपाणी : मधुकर पाटील मुनवळी-नरगुंद मार्गावर कार चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली. यानंतर कार शेतवडीत जाऊन थांबली. या अपघातात धामोड (ता.राधानगरी) जि. कोल्हापूर येथील कारमधील एक जण ठार, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला. घटनेची नोंद सौंदत्ती पोलिसात झाली आहे.

अजित चंद्रकांत धनवडे (वय 38) असे मृताचे नाव आहे. गंभीर जखमी उमेश शिवाजी मराठे (वय 34), दत्तात्रय लक्ष्मण बरगे (वय 40) व कारचालक संतोष सुरज सोनवणे (वय 38) रा.तिघेही धामोड (ता.राधानगर) जि. कोल्हापूर या तिघांवर सौंदती येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कारचालक संतोष सोनवणे हे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कोपळ येथे आपल्या कारमधून गेले होते. यावेळी त्‍यांच्या सोबत ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर (रा.केळोशी,खुर्द पैकी कानकेकरवाडी) यांच्यासह मित्र उमेश, दत्तात्रय व अजित या चौघांना घेऊन गेले होते. ते ट्रॅक्टर खरेदी करून आपल्या मूळगावी परतत असताना सौंदत्तीपासून 30 कि.मी.अंतरावर असलेल्या नरगुंद मार्गावर आतमटी गावाजवळ कारचालक संतोष सोनवणे यांचा कारवरील ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसली. यावेळी कार शेतवडीत जाऊन पलटी झाली. त्यामुळे कारचा चक्काचूर झाला.

यामध्ये कार चालक संतोषच्या बाजूला बसलेले अजित धनवडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेले उमेश व दत्तात्रय तसेच कारचालक संतोष हे तिघे गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रामदुर्ग सर्कलचे डीएसपी रामनगौडा हटी, सीपीआय जे. करणेशगौडा, उपनिरीक्षक आनंद कॅरीकट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन कारच्या मागे असलेल्या ट्रॅक्टर चालक शुभम सुरेश कानकेकर यांच्याकरवी सौंदत्ती पोलिसांनी अपघातातील जखमी व मृत व्यक्तीची ओळख पटवून कुटुंबियांसी संपर्क साधला.
त्यानुसार धामोड येथील अपघातातील मृत व जखमींच्या कुटुंबीयांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातातील मृत अजित हे धामोड परिसरातील प्रसिद्ध ट्रॅक्टर मेकॅनिक होते. तर जखमी उमेश यांचा स्क्रॅप विक्रीचा व्यवसाय असुन, संतोष हे लाकूड व्यापारी तर दत्तात्रय हे शेतकरी आहेत.मृत अजित यांच्या पक्षात आई, वडील, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या अपघाताचा पुढील तपास सीपीआय जे. करूणेशगौडा यांनी चालविला आहे.

हेही वाचा : 

Back to top button