बेळगाव : वीज दरवाढीविरोधात उद्योजक रस्त्यावर | पुढारी

बेळगाव : वीज दरवाढीविरोधात उद्योजक रस्त्यावर

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (दि. 22) चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध उद्योजक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वीज दरवाढ तत्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. तर उद्योजकांनी पुकारलेल्या या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला.

धर्मवीर संभाजी महाराज चौकातून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. विविध संघटनांचे पदाधिकारी हातात फलक घेऊन वीज दरवाढीविरोधात घोषणाबाजी करत होते. कॉलेज रोड, चन्नम्मा चौकमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. त्यावेळी परिसर गर्दीने फुलून गेला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देऊन सरकारने वीज दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अशी विनंती केली.

बेळगाव परिसरात सुमारे 32 हजार लघूउद्योजक आहेत. त्यांच्या मार्फत दीड लाखांपर्यंत रोजगार उपलब्ध झाले आहेत. आम्ही राज्याच्या विकासात महत्वाचे योगदान देत आलो आहोत. पण, आतापर्यंत पाच ते दहा टक्के वीज दरवाढ होत होती. ती आता 30 ते 70 टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. या मागचा तर्क आम्हाला समजलेला नाही. उद्योग आधीच आर्थिक संकटात असताना पुन्हा अन्यायकारक वीज दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे अनेक उद्योग बंद पडतील. इतके वीज बिल भरण्याची ताकद उद्योजकांकडे नाही. त्यामुळे राज्याच्या हितासाठी सरकारने ही अन्यायकारक वीज दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली. आम्ही कोणत्याही सरकारविरोधात नाही. त्यामुळे, आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्याची जबाबदारी विद्यमान सरकारची आहे, असेही सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी पाटील यांनी निवेदन स्वीकारुन ते सरकारकडे पाठवण्यात येईल, असे सांगितले. या आंदोलनात चेंबरचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, रोहन जुवळी, भरत देशपांडे, राम भंडारे, विकास कलघटगी, शरद पाटील, सुनील नाईक, अजित कोकणे, महादेव चौगुले, शंकरगौडा पाटील, जयवंत साळुंखे यांच्यासह लघू उद्योजक संघटना, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन, मायक्रो इंडस्ट्री असोसिएशन, मराठा रजक समाज, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव, औषध विक्रेते संघटना आदी सहभागी झाले होते.

Back to top button