कर्नाटक विधानसभा निवडणूक : ‘बेळगावा’त गुलाल कुणाचा? | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : ‘बेळगावा’त गुलाल कुणाचा?

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बेळगाव जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवारी 13 मे रोजी होईल. दुपारी दोनपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहेत. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मतमोजणी होणार्‍या आरपीडी महाविद्यालय परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. निकालानंतरही पूर्ण जिल्ह्यत मिरवणुका, सभा घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यात दहा हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यामध्ये अठरा जागांसाठी 187 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शनिवारी सकाळी 7.30 वा. निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूमचे सील काढण्यात येईल. त्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी फेरीनिहाय मतदान यंत्रे नेण्यात येणार आहेत. सकाळी 8 वा. मतमोजणीला प्रारंभ होणार असून, सुरुवातीला टपाली मतदानाची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर मतदान यंत्राच्या मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. सर्व अठराही विधानसभा मतदारसंघाचे निकाल दुपारी दोनपर्यंत अपेक्षित आहेत. मतमोजणीसाठी एकूण 828 मतमोजणी कर्मचारी, 360 निरीक्षक असे एकूण 1 हजार 188 मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

सीमा सुरक्षा दल, निम लष्करी दल, पोलिस कर्मचारी, केंद्र आणि राज्य राखीव दलाची तुकडी असा सुमारे दीड हजारभर पोलिसांचा बंदोबस्त मतमोजणीच्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. मतमोजणीकडे जाणारी सर्व खासगी वाहतूक मतमोजणी दिवशी पूर्णपणे बंद करून अन्य मार्गाकडे वळवण्यात आली आहे. अठरा मतदारसंघाची मतमोजणी अठरा कक्षांमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक मतदार संघनिहाय 14 टेबल मांडण्यात आले आहेत. या परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलिस अधीक्षक डॉ. संजीव पाटील आज दिवसभर मतमोजणीच्या ठिकाणी थांबून होते. सुरक्षा व्यवस्था आणि मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून कर्मचार्‍यांना सूचना देण्यात येत होत्या.

अशी होणार मतमोजणी…

  • सकाळी 7.30 वा. स्ट्राँग रूम उघडून मतदान यंत्रे बाहेर काढणार
  • मतमोजणीला सकाळी 8 वा. प्रारंभ होणार
  • सुरुवातीला टपाली मतांची मोजणी
  • प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 14 टेबल
  • मतमोजणी परिसरात बंदी आदेश लागू
  • मतमोजणीसाठी 1 हजार 188 कर्मचारी नियुक्त
  • दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त
  • एकूण 21 ते 27 मतमोजणीच्या फेर्‍या होणार
  • फेरीनिहाय निकाल जाहीर करणार
  • जनतेला स्पीकरवरून चौकात माहिती देणार
  • मतमोजणीच्या दोनशे मिटर बाहेर थांबण्यास परवानगी
  • ओळखपत्राशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला नाही.
  • एजंटांनाही ओळखपत्रांची सक्ती

वेबसाईटवरही फेरीनिहाय निकाल

यावेळी सर्व जनतेसाठी फेरीनिहाय निकाल पाहण्याची सोय वेबसाईट करण्यात आली आहे ुुु.ीर्शीीश्रीीं.शलळ.र्सेीं.ळप या वेबसाईटवर संपूर्ण राज्याचा फेरीनिहाय सर्व मतदारसंघाचा निकाल पहाता येणार आहे. एका फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्धा तासात निकाल या वेबवर अपलोड करण्यात येणार आहे.

कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात बंदी आदेशाबरोबर ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. मिरवणुकानाही बंदी घालण्यात आली आहे. विजयोत्सव साजरा करताना कायद्याचा भंग होता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी. निकाल सामंजस्याने स्वीकारण्यात यावा.
– नितेश पाटील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, बेळगाव

Back to top button