निपाणीत रंगोत्सवाचा उत्सव शिगेला; डीजेच्या तालावर तरूणाईचा ठेका | पुढारी

निपाणीत रंगोत्सवाचा उत्सव शिगेला; डीजेच्या तालावर तरूणाईचा ठेका

निपाणी : पुढारी वृत्तसेवा 

निपाणी शहर परिसरात आज (रविवार) ठिकठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. रंगपंचमी निमित्ताने आबालवृद्धांनी सप्तरंगांची उधळण केली. रंगपंचमीचे औचित्य साधून शहर उपनगरांतील चौकाचौकांत असलेल्या सार्वजनिक मंडळाच्या कार्यकत्यांनी तसेच उपनगरे, कॉलनी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी डीजे लावून मराठी, हिंदी गीतांवर ठेका धरत नाचण्याचा आनंद लुटला. गत दोन वर्षे रंगपंचमीवर कोरोनाचे सावट होते. यंदा मात्र तरुणाईने मोठ्या जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. शहर व उपनगरांतील चौकाचौकांत रंगपंचमी साजरी करण्यात आल्याने परिसरातील रस्ते विविध रंगांनी न्हाऊन निघाले होते. विशेष म्हणजे रंगपंचमी आज रविवारी आल्‍याने सुट्टीचा दिवस असल्याने या उत्साहाला अधिक उधाण आल्याचे दिसून आले.

संबंधित बातम्या

लहान मुलांनीही रंगपंचमी साजरी केली. रंगपंचमी निमित्ताने बालगोपाळांनी डोक्यावर आकर्षक टोप्या तसेच चेहऱ्यावर आकर्षक मुखवटे परिधान केले होते. काही परिसरातील मित्रमंडळाच्यावतीने पाण्याचे शॉवर लावण्यात आले होते. रंगपंचमीनिमित्त शहरातील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद होती. चिकोडीचे उपाधीक्षक डीएसपी बसवराज यलीगार, सीपीआय एस.सी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, शहर पोलीस ठाण्याचे विनोद पुजारी, खडकलाट पोलीस ठाण्याचे शिवानंद बनीकोप व बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे आनंद कॅरीकट्टी यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता रंगपंचमी उत्साहाने साजरी झाली. दुपारपर्यंत परिसरात रंगपंचमीचा जल्लोष सुरूच होता.

नदी घाटासह विहिरीवर गर्दी

ग्रामीण भागात रविवारी जल्लोषात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यामध्ये अनेक कुटुंबीयांनीही रंगपंचमीचा आनंद लुटला. रंग खेळून झाल्यानंतर बहुतेकांनी नजीकच्या विहिरींबरोबरच वेदगंगा नदी घाटावर, जत्राट, यमगर्णी, बुदिहाळ, सिदनाळ, चिखलीतील नदी घाटावर अंघोळीसाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे तरुणाईने या खेळाचा आनंद लुटताना दुचाकींचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन पुंगळ्या काढून आनंद लुटला. त्यामुळे सर्वत्र दिवसभर दुचाकींची रेलचेल सुरूच होती.

सकाळपासूनच रंगांची उधळण

शहरात सकाळपासूनच रंगपंचमीला उत्साहात सुरुवात झाली. रंगपंचमीनिमित्त अनेकांनी एकमेकांना रंग लावून तर काहींनी सोशल मीडियावर रंगपंचमीचे संदेश अपलोड करत रंगीबेरंगी शुभेच्छा दिल्या. सकाळपासूनच लहान मुलांनी एकमेकांच्या घरात जाऊन रंग लावत आनंद लुटला तर दुपारनंतर विशेषतः युवकांनी गाण्याच्या तालावर रंगांची उधळण करत जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. महिलांनीही कोरड्या रंगांऐवजी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

अहो सेठ आणि चंद्राची धूम…

विशेष म्हणजे आजच्या रंगोत्‍सवात परिसरात अनेक तरुण मंडळांनी डीजेच्या चालावर चौका चौकात रंगपंचमीचा खेळ साजरा करताना अहो सेठ लय दिसानी झालीया भेट, बाण नजरेतला घेऊन अवतरली सुंदरा चंद्रा या गाण्यावर ठेका धरून या सणाचा आनंद द्विगुणीत केला. दिवसभर या दोनच गाण्यांची धूम सर्वत्र डीजेसह इतरत्र सुरू असल्याचे दिसून आली. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या दोन गाण्यांनी वेधले होते.

हेही वाचा ; 

Back to top button