बारामती : देशी गोवंश सुधारणा प्रकल्प नवयुगाची सुरुवात | पुढारी

बारामती : देशी गोवंश सुधारणा प्रकल्प नवयुगाची सुरुवात

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प शेतकर्‍याचे जीवनमान बदलविणारा आहे. नवीन युगाची यामुळे सुरुवात होत असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. चांगल्या प्रतीच्या कालवडी जन्माला येण्यासाठी चांगल्या बिजाची गरज आहे. यासाठी योजना हाती घेतली जाणार असून, जनावरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचीही उभारणी करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या भारतातील पहिल्या देशी गोवंश सुधारणा प्रकल्प (सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इम्प्रूव्हमेंट : पशुधन अनुवंश सुधारणा केंद्र) सोबतच एम्ब्रियो ट्रान्सफर (आयव्हीपी) लॅबोरेटरीचे उद्घाटन शनिवारी (दि. 11) गडकरी यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार आदींची या वेळी उपस्थिती होती.

हा प्रयोग क्रांतिकारी असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, या प्रकल्पामुळे प्रतिदिन 40 लिटर दूध देणार्‍या गायीचे उत्पादन 120 लिटरपर्यंत नेणे शक्य आहे. मी नागपूरला 10 कोटी रुपये देत अशा पद्धतीचा प्रयोग केला. त्यातून 10 कालवडी व चार वळू तयार केले. मी हात-पाय मारले; परंतु त्या तुलनेत यश आले नाही. परंतु, येथे जगातील अत्याधुनिक प्रकल्प हाती घेतला गेला असून, तो शेतकर्‍यांचे जीवन बदलवू शकतो. उत्तम बीज तयार करणारे फार्म तयार व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विश्वस्त रणजित पवार यांनी केले.

दर्जेदार सीमेन उपलब्ध करून देणार
भारतातून ब्राझीलला गेलेली गीर गाय तेथे प्रतिदिन 60 लिटर दूध देते. या प्रकल्पातून जी जनावरे जन्माला घातली जातात, त्यात 99 टक्के कालवडी जन्माला येतात. भारत सरकारने सध्या विदेशी वळूंचे सिमेन्स आणण्यासंबंधी काही निर्बंध घातले आहेत. मी त्या वादात पडू इच्छित नाही. परंतु, अशा प्रकल्पांमुळे दुधाचे उत्पादन वाढल्याने शेतकर्‍यांना समृद्धता व संपन्नता लाभणार आहे. यासाठी मी योजना तयार करीत असून, त्यातून शेतकर्‍यांना अत्युच्च दर्जाचे सिमेन्स उपलब्ध करून दिले जाईल.

Back to top button