निपाणी : कुरली फाटा येथे वाहनाच्या धडकेत सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य ठार | पुढारी

निपाणी : कुरली फाटा येथे वाहनाच्या धडकेत सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य ठार

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीतील कुरली फाटा येथे रस्ता पास करण्यासाठी थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्याला भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सौंदलगा ग्रा. प. सदस्य किरण महादेव काळुगडे (वय 45) हे ठार झाले.हा अपघात मंगळवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास झाला.घटनेची नोंद ग्रामीण पोलीसात झाली आहे.दरम्यान अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.या घटनेमुळे सौंदलगा गावावर शोककळा पसरली आहे.

मयत किरण काळुगडे हे 2021 साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजपमधून उभे राहिले होते.ते वार्ड क्रमांक पाच मधून निवडून आले होते. सध्या ते चालक म्हणून कोल्हापुर येथे सेवेत होते. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी महामार्ग पास करण्यासाठी बाजूला थांबले होते.याचवेळी सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने कोल्हापूरहून बेळगावचे दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनधारकाला वळण न समजल्याने त्याच्या वाहनाची किरण यांना धडक बसली.यामध्ये किरण यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली,तर अपघातग्रस्त वाहन कामगारांच्या शेडमध्ये घुसले.यावेळी केवळ दैवबलवतर म्हणून दोघे कामगार बचावले.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत अध्यक्षा,सदस्य व ग्रामस्थांनी धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली.त्यानुसार घटनास्थळी ग्रामीण पोलीसासह रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमी किरण काळुगडे याला उपचारासाठी निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मयत किरण काळुगडे यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे. रात्री उशिरा मयत किरण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान फरार वाहन चालकाचा पोलिसांनी शोध चालवला असून पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ हे करीत आहेत.

Back to top button