बेळगाव : उचगाव भागातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला | पुढारी

बेळगाव : उचगाव भागातील मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला

उचगाव; पुढारी वृत्तसेवा :  महिनाभरात उचगाव भागातील मंदिरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. कनकेरे, सुर्ते येथील मंदिरे चोरट्यांनी फोडली असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. परिणामी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

चार दिवसांपूर्वी बसुर्ते येथील मंदिर फोडण्यात आले. त्यावेळी चांदीचे दागिने लंपास करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा चोरीची घटना घडली. बेकीनकेरे येथील नागनाथ मंदिरही चोरट्यांनी लक्ष्य केले असून शुक्रवारी रात्री सोन्याचे दागिने लंपास केले. दोन गावातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिसरातील भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेळगाव आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर दोन्ही गावे वसली आहेत. परिणामी चोरट्यांना चोरी करून फरार होण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. पोलिसांनी श्वानांच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु श्वान ठराविक अंतरापर्यंतच जात असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. यापूर्वीही या भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. परंतु अद्याप त्यांचाही छडा लागलेला नाही. परिणामी चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोलिस बंदोबस्तात, चोरटे मैदानात

सध्या बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्याच्या बंदोबस्तात पोलिस गुंतले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून दोन राज्यांच्या दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. याबाबत पोलिसांकडून सीमेवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचा फायदा चोरट्यांकडून उचलण्यात येत असून पोलिस बंदोबस्तात, चोरटे मैदानात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Back to top button