सीमाप्रश्न : यल्लम्मा भक्तांची वाहने अडवली! | पुढारी

सीमाप्रश्न : यल्लम्मा भक्तांची वाहने अडवली!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सौंदत्ती यल्लम्मा यात्रेचा मुख्य दिवस बुधवारी असून महाराष्ट्रातून लाखो भक्तगण सौंदत्ती डोंगरावर आले आहेत. मात्र मंगळवारी दुपारी हिरेबागेवाडीजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड गुंडांनी हल्ले केल्यामुळे कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रातून येणार्‍या यल्लम्मा भक्तांमध्ये तणावाचे वातावरण होते. त्यातच कागवाड नाक्यावर पोलिसांनी काही काळ वाहने अडवून धरल्याने या तणावात भर पडली. मात्र सायंकाळी जिल्हा पोलिसप्रमुखांनी महाराष्ट्रातील भक्तांनी बिनदिक्कतपणे यल्लम्मा दर्शनासाठी सौंदत्तीला यावे, असे आवाहन केले.

सीमा वादामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील प्रत्येक चेक पोस्टवर सध्या वाहने तपासून सोडली जात आहेत. सध्या सौंदत्ती यल्लमाची यात्रा सुरू असून उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. काही वाहनधारकांनी पोलिसांकडून अडवणूक होत असल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. शिवाय जे भक्तगण सौंदत्ती डोंगरावर पोहोचले आहेत, त्यांना उद्या पुन्हा महाराष्ट्रात जाऊ दिले जाणार नाही. तणाव निवळल्यानंतरच जा, असे सांगितल्याचीही चर्चा होती. तथापि, असे काहीही घडलेले नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्पष्ट केले.

डॉ. पाटील म्हणाले, सौंदत्ती डोंगरावर जाणार्‍या कोणत्याही वाहनाला कुठेही अडवले गेलेले नाही. उलट या वाहनांना वेगळे संरक्षण देऊन त्यांना व्यवस्थित सोडले जावे, अशी सूचना आपण प्रत्येक पोलिस ठाण्याला दिलेली आहे. त्यामुळे यल्लमा भक्तांना कुठेही अडवलेले नाही. कागवाड जवळ काही वाहने थोड्या वेळासाठी थांबवलेली होती. परंतु, तेथे वाहतूक कोंडी होत असल्याने थांबवल्याचे तेथील उपाधीक्षकाने सांगितले आहे. यानंतर तिथेही थांबलेली वाहने सोडली गेली आहेत. सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांना त्रास होणार नाही, याचीही दक्षता आपले अधिकारी घेतील.

Back to top button