बेळगाव : कोठडी मृत्यू प्रकरणातील अधिकार्‍यांची मंगाईला साकडेे; बकरे मारून पोलिसांना मेजवानी | पुढारी

बेळगाव : कोठडी मृत्यू प्रकरणातील अधिकार्‍यांची मंगाईला साकडेे; बकरे मारून पोलिसांना मेजवानी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  पोलिसांच्या ताब्यात असताना झालेला संशयिताचा मृत्यू वडगाव पोलिसांना चांगलाच महागात पडणार आहे. बंगळूरहून दाखल झालेले सीआयडी पथक अद्यापही या प्रकरणाची माहिती घेत आहे. मात्र, या प्रकरणातील अधिकार्‍यांनी वडगावचे ग्रामदैवत मंगाईदेवीला मंगळवारी बकरे मारून साकडे घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आई मंगाई, तूच आम्हाला यातून वाचव, असे साकडे वडगावचे पोलिस निरीक्षक श्रीनिवास हंडा यांनी मंगाईदेवीला घातल्याचे समजते.

बसनगौडा इरनगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लद बागेवाडी) याचा पोलिस ठाण्यात मृत्यू झाल्याने पोलिस खाते हादरले. तीन दिवसांपासून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारीही बेळगावातच थांबून आहेत. दीड दिवस त्यांनी वडगाव पोलिस ठाण्याची झाडाझडती घेतल्यानंतर बीम्स्मध्ये जाऊनही डॉक्टरांकडून माहिती घेतली आहे. अनेकांचे जबाब नोंदवल्यानंतर आता त्यांच्या तपासाला प्रारंभ होणार आहे.
वडगाव पोलिसांच्या ताब्यात असताना बसनगौडाचा मृत्यू झाल्याने वडगाव ठाण्यातील अधिकारी तणावाखाली आहेत. प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी व माहिती घेण्याचे काम सीआयडी पथकाकडून सुरू आहे. त्यामुळे ते आणखी गांगरलेले आहेत.

अधिकार्‍याला धसका, देवीला साकडे

एकीकडे चौकशीचा प्रकार सुरू असताना मंगळवारी दुपारी वडगावचे बहुतांश पोलिस मात्र मंगाई यात्रेत मटण व रस्स्यावर ताव मारण्यात दंग होते. याचे कारण शोधले असता पोलिस निरीक्षकांनी मंगाईदेवीला साकडे घालत आज देवीची पूजा केल्याचे समजते. पूजा जरी नेहमीची समजली तरी येथे बोकडाचे जेवण कोणी दिले, हे मात्र गुलदस्त्यात आहे. परंतु, अडचणीत आलेले पोलिस अधिकारी व येथील पोलिसांनी मंगाईदेवी तूच आम्हाला आता वाचव’, असे म्हणत हे जेवण दिल्याची चर्चा या परिसरात सुरू होती. सकाळी काहींनी निरीक्षकांना येथे पूजा करताना पाहिले व त्यानंतर अनेक पोलिस जेवण करून गेले. त्यामुळे या चर्चेला दुजोरा मिळत आहे.

मांसाहारी जेवण अन्य एका व्यक्तीच्या नावे असल्याचे वरवर दिसून येत असले तरी लॉकअप डेथ प्रकरणामुळे अडचणीत आलेले वडगाव पोलिस ठाणे आणि नेमका सीआयडी तपास सुरू असतानाच येथे पोलिस निरीक्षकांनी केलेली पूजा व बोकडाचे जेवण याचा संबंध स्पष्ट होत आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभर सीआयडी पथकाने माहिती घेतली. ते बुधवारपर्यंत बेळगावातच राहणार असून आणखी माहिती जमा करण्याचे काम सुरू आहे. मृताच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आल्यानंतरच बसनगौडाचा मृत्यू काझाला, हे स्पष्ट होणार आहे. यानंतर तपासाला दिशा मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

मी हिंदू आहे. हिंदू म्हटल्यानंतर जाऊन देवीची पूजा करण्यात काहीही गैर नाही. तेथे जेवण कोणी दिले व जेवणासाठी कोण कोण गेले होते, हे आपल्याला माहिती नाही. परंतु, सकाळी जाऊन आपण यथासांग पूजा करून आलो.
– श्रीनिवास हंडा, पोलिस निरीक्षक, वडगाव

Back to top button