बेळगाव : दिवाळीतही अंधार, आक्षेप हाच आधार | पुढारी

बेळगाव : दिवाळीतही अंधार, आक्षेप हाच आधार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : रिंगरोडसाठी आक्षेप दाखल करण्याची लगबग सुरू आहे. सोमवारी ऐन दिवाळीलाच अनेक शेतकरी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयात आक्षेप दाखल करण्यासाठी उपस्थित होते. वकीलही दिवसभर ठाण मांडून होते. 50 शेतकर्‍यांनी आक्षेप दाखल केले. भूसंपादनाच्या अधिसूचनेमुळे शेतकर्‍यांसमोर ऐन सणात अंधार पसरला आहे. यावर आक्षेप हाच एकमेव आधार असून आक्षेप दाखल करण्यात येत आहेत.

ऐन दिवाळीत तालुक्यातील 31 गावांमध्ये भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली आहे. यामुळे दिवाळी सण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जीवनात अंधार घेऊन आला आहे. रिंगरोडसाठी हजारो एकर जमीन संपादित करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. परिणामी, याविरोधात लढण्यासाठी आक्षेप हाच आधार बनला आहे. याविरोधात म. ए. समितीने शेतकर्‍यांच्या सहकार्याने एल्गार पुकारला आहे.

पहिल्या टप्प्यात अधिकाधिक शेतकर्‍यांचे आक्षेप दाखल करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात सर्व सोय करण्यात आली आहे. याठिकाणी म. ए. समितीच्या वकिलांची फौज उपस्थित राहत असून त्यांच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्रांच्या सहाय्याने अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सोमवारी सर्वत्र सणांची धामधूम सुरू असतानाही ता. म. ए. समिती युवा आघाडीचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण यांच्यासह नेतेमंडळींनी कार्यालयात ठाण मांडला होता.

गावोगावी संपर्क साधून शेतकर्‍यांना अधिक संख्येने अर्ज दाखल करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे समितीचे कार्यालय सणासुदीच्या दिवसातही शेतकर्‍यांनी गजबजले होते. जमीन वाचवण्यासाठी बळीराजांनी आक्षेप दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.

वकिलांची उपस्थिती

रिंगरोडचे संकट परतवून लावण्यासाठी म. ए. समितीने पुढाकार घेतला आहे. त्याला साथ अ‍ॅड. एम. जी. पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, अ‍ॅड. शाम पाटील यांच्याकडून देण्यात येत आहे. गावोगावी जागृती केल्यानंतर आक्षेप दाखल करण्यासाठी तालुका कार्यालयात वकिलांनी ठाण मांडले आहे. रविवारीही दिवसभर कार्यालय सुरू होते.

रिंगरोडसाठी भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याविरोधात अधिकाधिक शेतकर्‍यांनी आक्षेप दाखल करणे
गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी शेती वाचवणे अत्यावश्यक आहे. यामुळे दिवाळीलाही कार्यालयात उपस्थित राहून आक्षेप दाखल केले.
– अ‍ॅड. शाम पाटील

Back to top button