बंगळूर : आणखी एका स्वामींनी जीवन संपवले | पुढारी

बंगळूर : आणखी एका स्वामींनी जीवन संपवले

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :  बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगलच्या स्वामींनी जीवन संपवल्याची घटना ताजी असतानाच रामनगर जिल्ह्यातील कंचुगल (ता.मागडी) येथील बंडेमठाचे बसवलिंग स्वामींनी (वय 45) गळफास घेऊन जीवन संपवले. यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मठातील वरच्या खोलीच्या खिडकीला त्यांनी गळफास घेतला. काहीजण आपला अपप्रचार करत आहेत. काहींकडून धमक्या मिळाल्या
आहेत. आपल्याला कोणाचेही साहाय्य मिळालेले नाही, असे स्वामींनी चिठ्ठीत लिहिले आहे.

रामनगर जिल्ह्यामध्ये बंडेमठ प्रसिद्ध आहे. या मठाच्या आवारामध्ये शाळा-महाविद्यालये आहेत. मठाची सुमारे 50 कोटींची मालमत्ता आहे. मठाद्वारे अनेक सामाजिक कार्ये हाती घेण्यात आली होती. गावामधील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता.

चिठ्ठीबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिलेली नाही. पोलिस चौकशीनंतर आणखी माहिती उघड होणार आहे. बसवलिंग स्वामी हे चन्नमल्लय्या पुट्टगौरम्मा यांचे आठवे चिरंजीव होते. त्यांच्या पश्चात 5 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. पहिली ते आठवीपर्यंत त्यांनी सिद्धगंगा मठामध्ये शिक्षण घेतले. त्यांच्या नावे 80 एकर जमीन आहे. बसवलिंग स्वामी बंडेमठामध्ये शिक्षण संस्था चालवत होते. याआधी बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील स्वामींनी अशाचप्रकारे मठामध्ये गळफास घेतला होता.

Back to top button