बेळगाव : बाराही महिने पाऊस पडेल … कृष्णात डोणे महाराजांची भाकणूक | पुढारी

बेळगाव : बाराही महिने पाऊस पडेल ... कृष्णात डोणे महाराजांची भाकणूक

कोगनोळी; पुढारी वृत्तसेवा :  अल्पकाळाचे पीक येईल. मेंढी मोलाची होईल. आजाराला कंटाळून डॉक्टर लोक हात टेकतील. भारताच्या शेजारील देशांपासून संकट निर्माण होईल. अवेळी पावसामुळे नुकसान होईल. कोरोनापेक्षाही भयंकर आजार येईल. बाराही महिने पाऊस पडेल, अशी भाकणूक कोगनोळी बिरदेव यात्रेनिमित्त वाघापूर येथील कृष्णात डोणे महाराज यांनी वर्‍हाडी भाषेत कथन केली. सत्यात उतरणारी भाकणूक ऐकण्यासाठी कर्नाटकासह  महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी मेघराजाच्या उपस्थितीतही गर्दी केली होती. रात्री वालंग, सबिना, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यात्रा उत्साहात

कोगनोळी येथील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरदेवाची यात्रा उत्साहात पार पडली. मानकर्‍यांच्या उपस्थितीत करबांधणीने यात्रेला सुरुवात झाली होती. शुक्रवारी भर यात्रा पार झाली. यात्रेदिवशी सकाळपासूनच भाविकांनी नैवेद्य अर्पण करण्यासाठी मंदिरामध्ये
गर्दी केली होती. अनेक भाविकांनी बिरदेवाचे नवरात्रही केले होते. यात्रेनिमित्त दोन्ही गटांकडून शर्यतीचे आयोजनही केले होते.

यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शनिवारी सकाळी बिरदेव यात्रा कमिटीतर्फे शर्यती पार पडल्या. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. सायंकाळी कर तोडून यात्रेची सांगता करण्यात आली. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी माजी आ. वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व धनगर समाज बांधवांचे सहकार्य लाभले. यात्रा भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरी करण्यात आली.

Back to top button