बेळगाव : जिल्ह्यात 49 जागा रिक्त; पात्र शिक्षक 65 | पुढारी

बेळगाव : जिल्ह्यात 49 जागा रिक्त; पात्र शिक्षक 65

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  राज्यात मराठी माध्यमांसाठी समाज विज्ञान विषय शिक्षकांच्या 98 जागा रिक्त आहेत. नुकत्याच झालेल्या टीईटी, सीईटीत 92 उमेदवार पात्र झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यात 49 जागा रिक्त असून पात्र उमेदवारांची संख्या 65 आहे. बिदर, गुलबर्गा, बागलकोट जिल्ह्यात समाज विषय शिक्षकांच्या जागा रिक्त असून त्या जिल्ह्यात पात्र उमेदवारांना संधी मिळणार का, अशी चर्चा आहे.

शिक्षक भरतीसाठी आवश्यक टीईटी व सीईटी एकाच दिवशी घेण्यात आली. त्यामुळे बेळगावशिवाय अन्य जिल्ह्यात परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच ठिकाणी परीक्षा देता आली. राज्यात मराठी माध्यमासाठी समाज विज्ञान शिक्षकांच्या 98 जागा मंजूर झाल्या आहेत. पात्र उमेदवारांची संख्या 92 आहे. अद्याप 6 पात्र उमेदवारांची गरज आहे. बेळगाव जिल्ह्यात 49 जागा रिक्त असून, पात्र उमेदवारांची संख्या 65 आहे. बिदरमध्ये 45 जागा असून 17 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. गुलबर्गा जिल्ह्यासाठी 4 व बागलकोट जिल्ह्यासाठी 1 समाज विज्ञान शिक्षकांची जागा रिक्त आहे. मात्र, या ठिकाणी पात्र उमेदवारांची संंख्या शून्य आहे. बेळगाव जिल्ह्यात अतिरिक्त पात्र उमेदवारांची संख्या 16 आहे. या उमेदवारांना बिदर, गुलबर्गा, बागलकोट या ठिकाणी संधी दिल्यास शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा होईल. मात्र, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे.

बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण व खानापुरात मोठ्या प्रमाणात डी.एड्. व बी. एड्. धारक आहेत. पात्र उमेदवारदेखील याच भागातील अधिक आहेत. 5 हजारांहून अधिक डी.एड्. व बी. एड्. धारकांनी टीईटी व सीईटी दिली होती. त्यापैकी केवळ मराठी माध्यमातील 92 उमेदवार शिक्षक भरतीत पात्र ठरले आहेत.

Back to top button