बेळगावमधील खुनाचा उलगडा; माय-लेकीनेच काढला काटा | पुढारी

बेळगावमधील खुनाचा उलगडा; माय-लेकीनेच काढला काटा

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  परदेशात राहून नवरा पैसे पाठवत होता, तोपर्यंत तो चांगला होता. कोरोनामुळे तो घरी परतला अन् पैशाचा हिशोब विचारू लागला. शिवाय पत्नी व मुलांची बाहेरची चैनी बंद करत त्यांच्या स्वातंत्र्यावरही गदा आणली. हीच बाब खटकल्याने कॅम्प येथील रिअल इस्टेट एजंटाचा खून माय-लेकीनेच संगनमताने घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुनासाठी त्यांनी मुलीच्या प्रियकराची मदत घेतली असून या तिघांना अटक झाली आहे.

रिअल इस्टेट एजंट असलेले सुधीर कांबळे यांचा 17 सप्टेंबरच्या रात्री घरात घुसून खून झाला होता. त्याबद्दल सुधीर यांची पत्नी रोहिणी सुधीर कांबळे (वय 43,) मुलगी स्नेहा (वय 24, दोघीही रा. मद्रास स्ट्रीट, कॅम्प) व स्नेहाचा प्रियकर अक्षय महादेव विठकर (वय 29, रा. पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुधीर घरातील एका खोलीत आणि बाकी कुटुंबीय दुसर्‍या खोलीत झोपलेले असताना असताना हा खून झाल्याने गूढ वाढले होते.

सुधीर अनेक वर्षांपासून दुबईमध्ये काम करत होते. परंतु, कोरोना काळात त्यांची परदेशातील नोकरी गेली व ते आपल्या घरी आले. त्यांना पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे. गेली अनेक वर्षे ते दुबईत राहूनच कुटुंबाला दरमहा मोठी रक्कम पाठवत होते. परंतु, कोरोना काळात ते घरी परतले व महिन्याला येणारी रक्कमही बंद झाली. त्यातच त्यांचे आधीपासूनच पत्नीशी पटत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सातत्याने खटके उडत होते. सुधीर परदेशातून आणलेला पैसा स्वतःला वाट्टेल तसा खर्च करत होते. शिवाय पैशाचा हिशोबदेखील ते पत्नीला विचारत होते. तो मिळत नसल्याने सुधीर यांनी काही महिन्यांपासून घरी रक्कम देणेही कमी केले. तसेच रोहिणीला त्यांनी पूर्वीसारखे बाहेर जाऊ देणे बंद केले. रोहिणीचे माहेर पुणे असून या दांपत्याची एक मुलगी स्नेहा ही शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात राहात होती. तिचे तेथील प्रेमप्रकरण कळल्यानंतर तिलादेखील ते सातत्याने फोन करून झाडाझडती घेत होते.

Back to top button