नकली नर्सकडून अर्भकाचे अपहरण; पोलिसांनी लावला सहा तासांत छडा | पुढारी

नकली नर्सकडून अर्भकाचे अपहरण; पोलिसांनी लावला सहा तासांत छडा

संबरगी ः पुढारी वृत्तसेवा अथणी येथील सरकारी दवाखान्यांमधून बुधवारी नवजात अर्भकाचे अपहरण केलेल्या महिलेला पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये गजाआड करून त्या अर्भकास त्याच्या मातेकडे स्वाधीन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली. अथणी येथे पोलिस स्टेशनच्या कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते.

ऐनापूर येथील अंबिका भोई या महिलेला बाळंतपणासाठी अथणी शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजता तिची प्रसूती होऊन मुलगा झाला. त्यानंतर एका नर्सने वजन करण्याचे सांगून त्या अर्भकाला घेऊन गेली. तब्बल अर्धा तास झाला तरी ती नर्स आली नसल्याने मातेने आरडाओरड केली.

सदर सप्रकार लक्षात येताच तिचा पती अमित भोई यांनी अथणी पोलिस स्टेशनला माहिती दिली. अथणी पोलिसांनी याबाबत त्वरित कार्यवाही करून सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे केवळ तासांमध्ये सदर महिलेला म्हैशाळ येथे पकडून गजाआड केले. मालाश्री उर्फ ऐेशर्या कांबळे (रा. म्हैसाळ, ता. मिरज) असे त्या महिलेचे नाव असल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले.

अथणी सरकारी दवाखाना व इतर खासगी दवाखान्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत. तसेच कर्मचार्‍यांना ओळखपत्र द्यावे. अशा सूचना केल्याचे पोलिस प्रमुखांनी सांगितले. डीएसपी विेशनाथ जलदे, रवींद्र नायकवडी, पीएसआय शंकर मुखर्जी, प्रवीण कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली. अथणी तालुका वैद्याधिकारी बसगवडा कागे यांच्याशी संपर्क साधला असता आपण तालुका पंचायत सभेस उपस्थित होतो. याची माहिती मला कळताच तातडीने पोलिस स्टेशनला माहिती दिल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलिसांना बक्षीस

अथणी पोलिसांनी चागली कामगिरी केल्यामुळे जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील व पोलिस उपमहासंचालक अलोककुमार यांच्याकडून वीस हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले.

Back to top button