कन्याकुमारीतील साधनेतून साकारले नवे संकल्प

कन्याकुमारीतील साधनेतून साकारले नवे संकल्प

[author title="नरेंद्र मोदी, पंतप्रधान" image="http://"][/author]

लोकशाहीच्या सर्वात मोठ्या महापर्वाचा एक टप्पा शनिवारी पूर्ण झाला. तीन दिवस कन्याकुमारीतील आध्यात्मिक यात्रेनंतर दिल्लीला रवाना झालो. लोकसभा निवडणुकीतील अनेक अनुभव आहेत, अनेक अनुभूती आहेत. स्वतःमध्ये अपार ऊर्जेचा प्रवाह मी अनुभवत आहे. अमृतकाळातल्या या पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानाची सुरुवात मी 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्थळ मेरठ येथून केली. हे विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीहून दिल्लीला परतत असताना विमान प्रवासात लेखणीबद्ध केले आहेत.

भारतमातेची परिक्रमा करत या निवडणुकीतली माझी शेवटची प्रचार सभा पंजाबमधील होशियारपूरमध्ये झाली. संत रविदास यांची तपोभूमी असलेल्या आणि आपल्या गुरूंची भूमी पंजाबमध्ये शेवटची प्रचार सभा होण्याचे भाग्य विशेष आहे. त्यानंतर मला कन्याकुमारीमध्ये भारतमातेच्या चरणांशी बसण्याची संधी मिळाली. सुरुवातीच्या क्षणांत निवडणुकीचा कोलाहल तनामनात दाटला होता. रॅली, रोड शोमध्ये पाहिलेले असंख्य चेहरे नजरेसमोर येत होते. माता-भगिनींचा तो अपार स्नेहाचा उमाळा, त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या नजरेतील माझ्याप्रती असलेला विश्वास, आपुलकी हे मी सर्व सामावत होतो. माझे डोळे पाणावत होते. मी नीरवतेमध्ये जात होतो, साधनेत प्रवेश करत होतो. काही क्षणांतच राजकीय वादविवाद, आरोप-प्रत्यारोप, आरोपांचा आवाज आणि शब्द सारे काही अंतर्धान होऊ लागले.

माझ्या मनातला विरक्त भाव अधिक गडद झाला. माझे मन बाह्य जगतापासून पूर्णपणे अलिप्त झाले. कन्याकुमारीचे हे स्थान नेहमीच माझ्या हृदयाच्या अतिशय जवळ राहिले आहे. कन्याकुमारीत काही काळ राहणे, तिथे ये-जा करणे स्वाभाविक स्वरूपात होत असायचे. काश्मीर-कन्याकुमारी ही प्रत्येक देशवासीयाच्या अंतर्मनात कोरली गेलेली एक ओळख आहे. हे ते शक्तिपीठ आहे, जिथे माता शक्तीने कन्याकुमारीच्या रूपात अवतार घेतला. या दक्षिणी टोकावर माता शक्तीने भगवान शंकरासाठी तपस्या आणि प्रतीक्षा केली, जे भारताच्या सर्वात उत्तरेकडील टोकावरील हिमालयावर विराजमान होते. भारत हजारो वर्षांपासून विचारांच्या संशोधनाचे केंद्र राहिला आहे. आपण जे मिळवले आहे, त्याला कधीही आपली वैयक्तिक ठेव मानून आर्थिक किंवा भौतिक निकषांवर त्याची तुला केली नाही.

भारताच्या कल्याणातून जगाचे कल्याण आणि भारताच्या प्रगतीतून जगाची प्रगती, या धारणेचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपली स्वातंत्र्य चळवळ आहे. 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यावेळी जगातील अनेक देश पारतंत्र्यात होते. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याने त्या देशांनाही प्रेरणा आणि बळ दिले आणि त्या देशांनीही स्वातंत्र्य मिळवले. कोरोना महामारीच्या कसोटी पाहणार्‍या काळाचे उदाहरणही आपल्यासमोर आहेच. त्यावेळी गरीब आणि विकसनशील देशांबद्दल शंका व्यक्त केली जात होती; परंतु त्या काळात भारताने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे अशा सर्व देशांना प्रोत्साहन आणि सहकार्यही मिळाले.

सद्यःस्थितीत भारताची प्रगती आणि भारताचा उदय ही केवळ भारतासाठीचीच मोठी संधी आहे, असे नाही. या उलट जगभरातील आपल्या सर्व सहप्रवासी देशांसाठीही ही एक ऐतिहासिक घटना असणार आहे. जी-20 च्या यशस्वी आयोजनानंतर अवघे जग भारताची ही ठाम भूमिका अधिक स्पष्टतेने स्वीकारू लागले आहे. आज भारताला ग्लोबल साऊथ वर्गवारीअंतर्गत येणार्‍या देशांचा एक सशक्त आणि महत्त्वाचा आवाज म्हणून मान्यता मिळू लागली आहे. भारताच्या पुढाकारानेच आफ्रिकी महासंघ जी-20 समूहाचा सदस्य देश होऊ शकला आहे.

आता एकही क्षण वाया न घालवता आपल्याला आपल्या जबाबदार्‍या आणि मोठ्या उद्दिष्टांच्या दिशेने पावले उचलायची आहेत. भारताचा विकास आपल्याला जागतिक परिप्रेक्ष्यातून पाहायचा आहे आणि त्यासाठी आपण भारताचे अंतर्भूत सामर्थ्य समजून घेणे आवश्यक आहे. आजच्या वैश्विक परिस्थितीमध्ये युवा राष्ट्र म्हणून भारताचे सामर्थ्य आपल्यासाठी सुखद संयोग आणि सुसंधी असून, आता मागे वळून पाहायचे नाही. 21 व्या शतकातील जग आज भारताकडे खूप आशेने पाहत आहे. वैश्विक परिद़ृश्याचा विचार करता पुढे जाण्यासाठी आपल्याला काही बदलही करावे लागतील. सुधारणा याबाबतचा पारंपरिक विचारही आपल्याला बदलायला हवा. भारत, सुधारणा केवळ आर्थिक बदलांपुरता मर्यादित ठेवू शकत नाही. आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणेच्या दिशेने मार्गक्रमण करावे लागेल.

आपल्या सुधारणा विकसित भारत 2047 च्या संकल्पाला अनुरूप असायला हव्यात. आपल्याला हेदेखील समजून घेतले पाहिजे की, देशासाठी सुधारणा ही कधी एकतर्फी प्रक्रिया होऊ शकत नाही. देशाला विकसित भारत बनवायचे असेल तर आपल्याला उत्कृष्टता मूलभाव बनवावा लागेल. आपल्याला वेग, श्रेणी, व्याप्ती आणि मानके असे चहुबाजूंनी वेगाने काम करावे लागेल. आपल्याला प्राचीन मूल्यांचा आधुनिक स्वरूपात अंगीकार करताना आपला वारसा आधुनिक रूपात पुनर्परिभाषित करावा लागेल. आपण पुढील 25 वर्षे केवळ आणि केवळ राष्ट्रासाठीच समर्पित करूया. मी देशाची ऊर्जा पाहून, असे म्हणू शकतो की, लक्ष्य आता दूर नाही. चला, वेगाने पावले टाका, एकत्र चालूया, भारताला विकसित राष्ट्र बनवूया.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news