जातीधर्मापेक्षा माणुसकीच ठरली वरचढ; गोकाकमध्ये मुस्लिम दांपत्याकडून हिंदू बाळंतिणीचा सांभाळ

जातीधर्मापेक्षा माणुसकीच ठरली वरचढ; गोकाकमध्ये मुस्लिम दांपत्याकडून हिंदू बाळंतिणीचा सांभाळ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : समाजातील धार्मिक तेढ कसे वाढीस लागेल, याचा प्रयत्न काहीजण नेहमीच करत असतात. मात्र, स्थानिक पातळीवर सर्वधर्मियांमध्ये सलोखाच अधिक असतो. त्याचाच दाखला देणारी एक घटना नुकतीच गोकाकला घडली. एका मुस्लिम दांपत्याने हिंदू बाळंतिणीची देखभाल करुन माणुसकीचा हाच एकमेव धर्म असल्याचे दाखवून दिले. याची दखल घेत पोलिस खात्याने या दांपत्याचा रविवारी (दि. 2) सत्कार केला.

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या मातेने जिल्हा रुग्णालयातील प्रसुतीगृहात बाळाला जन्म दिला. मात्र, मातेसह बाळाची प्रकृती नाजूक असल्याने एका मुस्लिम दांपत्याने दोघांनाही आपल्या घरी नेऊन त्यांची देखभाल केली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मातेसह मुलाला घरी पाठवून दिल्याची ही घटना सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दंडापूरमधील (ता. गोकाक) आजाराने त्रस्त असलेल्या शांतव्वा नामक महिलेने 14 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात एका बाळाला जन्म दिला. पण ते अर्भक आजारी होते. शेजारच्या बेडवर असलेल्या शमा रिजवान देसाई यांनी शांतव्वा आणि नवजात शिशुची देखभाल केली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर देसाई दांपत्याने शांतव्वा व त्यांच्या बाळाला गोकाकमधील आपल्या घरी नेले. बाळ पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची काळजी घेतली. दोघेही बरे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिले. माता व बाळाचा सांभाळ करणार्‍या मुस्लिम दांपत्याचे कौतुक केले जात आहे. याची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी त्या मुस्लिम दांपत्याचा सत्कार करुन त्यांच्या कार्याचा गौरव केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news