उमेश कत्ती : स्वतंत्र उत्तर कर्नाटकचा ‘आवाज’ थांबला | पुढारी

उमेश कत्ती : स्वतंत्र उत्तर कर्नाटकचा ‘आवाज’ थांबला

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्यावर त्यांच्या मूळगावी बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथे बुधवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून त्यांच्या हजारो चाहत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्या निधनाने उत्तर कर्नाटकाची स्वतंत्र मागणी सातत्याने लावून धरणारा एकमेव आवाज हरपला आहे. बंगळूर येथे वास्तव्यास असताना उमेश कत्ती (वय 61) यांचे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने बंगळूरमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

बेल्लद बागेवाडी गावातील त्यांच्या मळ्यात त्यांचे वडील विश्वनाथ कत्ती आणि आई राजेश्वरी यांच्या समाधीशेजारीच त्यांच्यावर अंत्यसंकार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, पालकमंत्री गोविंद कारजोळ, केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, महसूलमंत्री आर. अशोक, खा. मंगल अंगडी, माजी मंत्री आ. सतीश जारकीहोळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील, आ. प्रकाश हुक्कीरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व पक्षांचे नेतेमंडळी उपस्थित होती. त्यांच्या पत्नी शीला, मुलगा व हिरा शुगर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती, मुलगी स्नेहा, त्यांचे बंधू माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्यासह त्यांची नातवंडे उपस्थित होते.

तीन दिवसांचा दुखवटा

त्यांच्या निधनाबद्दल तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला. 9 सप्टेंबरपर्यंत कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत. त्याचबरोबर
तीन दिवस सर्व शासकीय कार्यालये, मंत्रालयावरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावरती राहणार आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनातून काचेच्या पेटीत ठेवलेले त्यांचे पार्थिव संकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना आवारात आणण्यात आले. या ठिकाणी दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. रात्री पार्थिव बेल्लद बागेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यांच्या आई-वडिलांच्या समाधीशेजारीच त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. हवेत गोळीबार करून सलामी देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर, आ. रेवण्णा, आ. गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश हुक्केरी, माजी मंत्री आ. श्रीमंत पाटील, आ. चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह भाजप, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आजी- माजी आमदार, खासदार आदी उपस्थित होते.

बंगळूर येथील डॉलर्स कॉलनीतील निवासस्थानी मंत्री उमेश कत्ती यांना रात्री साडेअकराच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. त्यांना एम. एस. रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. इमर्जन्सी युनिटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता अर्ध्या तासात त्यांची प्राणज्योत मालवली. हे वृत्त समजताच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक मंत्र्यांनी रुग्णालयात धाव घेतली.हुक्केरी मतदारसंघातून आठ वेळा निवडून आलेले ते ज्येष्ठ आमदार होते. 1983 मध्ये त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी अगदी लहान वयात पोटनिवडणूक जिंकली आणि ते आमदार झाले.

पक्षापलीकडे आमची मैत्री : सिद्धरामय्या

पक्षांच्या पलीकडे जाऊन आमची उमेश कत्ती यांच्याशी मैत्री होती, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. कत्ती
यांच्या अंत्यसंस्कारसाठी उपस्थित राहण्यासाठी सिद्धरामय्या बुधवारी सांबरा विमानतळावर आले असता पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, संपूर्ण उत्तर कर्नाटकचा विकास व्हावा, ही इच्छा कत्ती यांची होती. आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे असलो तरी उमेश कत्ती यांच्याशी आमची चांगली मैत्री होती. उमेश कत्ती हा अतिशय मनमिळावू माणूस होता

प्रिय मित्र हरपला : मुख्यमंत्री बोम्मई

माझे प्रिय मित्र, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी, राज्याचे दिग्गज नेते उमेश कत्ती यांच्या निधनाने मला अति व दु:ख झाले आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला आपण जड अंतःकरणाने उपस्थित राहत आहे, अशी खंत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कत्ती यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आणि तीन दिवस 7 ते 9 सप्टेंबर सरकारी कार्यक्रम न घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दोड्डबल्लापूर येथे उद्या होणारा जनोत्सव कार्यक्रम रविवार दि. 11 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button