बेळगाव : निपाणी तालुक्यात 125 हेक्टरवरील पिकांचे नुकसान | पुढारी

बेळगाव : निपाणी तालुक्यात 125 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

निपाणी; मधुकर पाटील :  तालुक्यात पावसाने 125 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल रयत संपर्क केंद्राने बनविला असून खात्याकडे पाठविला आहे. आता शेतकर्‍यांना नुकसान झालेल्या पिकांच्या सर्वेक्षणाची प्रतीक्षा लागून आहे. तालुक्यातील बंधारे खुले झाल्यावर आणि नदीकाठावरील पातळी ओसरल्यावर पिकांचे पंचनामे होतील, असे सांगण्यात आले होते. सध्या तालुक्यातील बहुतेक बंधारे खुले झाले आहेत. पाणी पातळी ओसरली तरी पंचनाम्यास सुरुवात झालेली नाही.

शहर परिसरात 15 जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या काळात दोनवेळा सर्व बंधारे पाण्याखाली गेले. शिवाय नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली. प्रशासनाने खबरदारीसाठी घरांच्या पडझडीसह पिकांच्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्यासाठी तयारी चालवली होती. त्यापैकी पडझड झालेल्या घरांच्या पंचनाम्यासाठी पथके नियुक्त करून काम सुरु झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अद्याप पथके नियुक्त झालेली नाहीत. काही पिके काढून तंबाखूसह अन्य पिके घेणार्‍यांना पंचनाम्याची प्रतीक्षा आहे. पंचनामे वेळेत झाले नाहीत, तर पुढील नियोजित पिके घेण्यावर त्याचा परिणाम होईल. पहिल्या पावसानंतर शेतीसह नदीकाठावरील पाणी ओसरल्यावर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे होणार होते. मात्र पाणी ओसरेपर्यंत पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला.

प्रारंभी 600 हेक्टर पीक क्षेत्र पाण्यात असल्याची माहिती येथील कार्यालयाने दिली होती. आता नुकसान झालेल्या पीक क्षेत्राची माहिती संकलित करावी लागणार आहे. यापूर्वी विविध गावांत कृषी अधिकार्‍यांनी भेट देऊन नुकसानीची प्राथमिक माहिती घेतली आहे. मात्र, बांधावर जाऊन पंचनामे झाल्यावर प्रत्यक्ष नुकसानीचे प्रमाण स्पष्ट होणार आहे. खात्याने कृषी अधिकार्‍यांना पंचनामा करण्यास सांगितले आहे. मात्र, पंचनाम्याचे नियोजन तहसील प्रशासनाकडून चालणार आहे. पंचनाम्यासाठी कृषी खात्याकडून अधिकारी, कर्मचार्‍याची यादी बनवली आहे. प्रत्येक गावातील तलाठी, महसूल निरीक्षक व कृषी खात्याचे कर्मचारी मिळून 29 जणांचा सहभाग आहे. मात्र, यादीला अद्याप अंतिम मंजुरी बाकी आहे.

पंचनाम्यासाठी संभाव्य अधिकारी, कर्मचार्‍यांची यादी मंजुरीसाठी संबंधित प्रशासनाकडे पाठवली आहे. पथके निश्चित झाल्यावर पंचनामे सुरू होतील.
– पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, रयत संपर्क केंद्र निपाणी

Back to top button