बेळगाव : वडगाव मंगाई यात्रा आजपासून | पुढारी

बेळगाव : वडगाव मंगाई यात्रा आजपासून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  वडगाव येथील मंगाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवार दि. 26 पासून असून देवस्थानच्या हक्कदार चव्हाण-पाटील परिवार समितीतर्फे मंदिर परिसरात नियोजन करण्यात आले आहे. पार्किंग तसेच भाविकांच्या दर्शनासाठी बॅरिकेटस् लावून व्यवस्था करण्यात आली आहे.

आठ दिवसांपूर्वी आमदार अभय पाटील यांच्या आमदार निधीतून मंदिराभोवती कंपाऊंड बांधकाम पूर्ण केले आहे. उर्वरित काम आगामी काही दिवसात पूर्ण होणार आहे. तर सोमवार दि. 25 रोजी दुपारी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यानी मंदिर परिसराला भेट देऊन बंदोबस्ताच्या सूचना कनिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

दोन वर्षे कोरोनामुळे मंगाई यात्रा मोठ्या प्रमाणात भरली नव्हती. साधेपणाने पंचमंडळीतर्फे फक्‍त धार्मिक कार्यक्रम विधीवत करण्यात आले होते. मात्र यंदा कोरोनामुक्त वातावरण असल्याने यात्रा मोठ्या प्रमाणात होणार आहे. मंगळवार दि. 26 रोजी सकाळी प्रथम ढोल ताशा मिरवणुकीने वडगाव परिसरातील सर्व देवतांचे पूजन चव्हाण- पाटील परिवार यांच्यावतीने होणार आहे. मंगाई मंदिराजवळ गार्‍हाणे उतरणी कार्यक्रम होणार आहे. यानंतर भाविक आपापल्या घरी महाप्रसादाला सुरुवात करणार आहेत.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर आकर्षकपणे रंगवले असून मंदिर प्रवेशद्वारावर आकर्षक प्रवेशद्वारही साकारण्यात आले आहे. तर भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेट्स लावून नियोजन केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासूनच परिसरात खेळण्याची तसेच विविध खेळणी, फुलांचे स्टॉल, खाऊंची दुकानेही मोठ्या प्रमाणात लागली आहेत.

मंगळवारी सकाळी वडगाव परिसरातील यल्लमा देवी, लक्ष्मीदेवी, ब्रह्मदेव या मंदिराकडे ढोल मिरवणुकीने जाऊन पूजन करण्यात येईल. अन्य प्रमुख विधी मंगाई देवस्थानजवळ होणार आहेत. त्यानंतर भाविकांना ओटी भरण्यासाठी तसेच दर्शनसाठी मंदिर खुले होणार आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाटील गल्ली, यरमाळ रोड, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, धामणे रोड, वझे गल्ली या ठिकाणी छोट्या-मोठ्या दुकानांनी तसेच खेळण्यांच्या स्टॉलची गर्दी लक्ष वेधून घेत आहे. परिसरातील भाविकांमध्ये उत्साह असून दोन वर्षानंतर होणार्‍या यात्रेला कर्नाटकसह महाराष्ट्रातील हजारो भाविकांची उपस्थिती असणार आहे. यात्रेनिमित्त महानगरपालिका आरोग्य विभागाने तसेच पोलिस प्रशासनाने ही नियंत्रण ठेवले आहे.

Back to top button