बेळगाव महापालिका निवडणूक : छाननीत सात जणांचे अर्ज अवैध | पुढारी

बेळगाव महापालिका निवडणूक : छाननीत सात जणांचे अर्ज अवैध

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव महापालिका निवडणूक साठी दाखल 519 अर्जांपैकी छाननीत सात जणांचे अर्ज अवैध ठरले. तर 44 जणांनी दोन अर्ज दाखल केले असून आता रिंगणात 468 जण राहिले आहेत. आज दिवसभर ही छाननीची प्रक्रिया चालली. त्यामध्ये किरकोळ बाचाबाचीच्या घटना वगळता प्रक्रिया शांततेत पार पडली.

बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी तब्बल 434 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे एकूण 519 अर्ज निवडणूक अधिकार्‍यांकडे जमा होते. त्यावर आज छाननीची प्रक्रिया पार पडली. सकाळी 11 वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. उमेदवाराची संख्या मोठी असल्यामुळे छाननीही संध्याकाळी पाचपर्यंत चालली.

छाननीसाठी पुन्हा निवडणूक अधिकार्‍यांची कार्यालये गर्दीने फुलून गेली होती. लोकांना रांगेत थांबवून छाननी करण्यात येत होती. शहरातील बारा ठिकाणी हे काम सुरू होते.

प्रभाग 53 व काही ठिकाणी छाननीवेळी काहींनी आक्षेप घेतल्यामुळे बाचाबाचीच्या घटना घडल्या. पण, उर्वरीत सर्व प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक अधिकार्‍यांनी छाननीत अर्ज अवैध ठरू नये, यासाठी आधीच उमेदवारांना अर्ज दाखल करताना आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती दिली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्ज अवैध ठरले नाहीत.

अर्ज छाननीसाठी उमेदवारांची कार्यालयासमोर गर्दी होती. पण, सोमवारसारखा पोलिस बंदोबस्त राखण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना नियमावलींचे उल्‍लंघन झाल्याचे दिसून येत होते.

मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6

बेळगाव : बेळगाव महापालिकेसाठी मतदानाची वेळ एका तासाने वाढवण्यात आली आहे. यासाठी 3 सप्टेंबरला मतदान होणार असून, यापूर्वी ही वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत होती. यामध्ये आता एक तासाने वाढ करण्यात आली आहे. ही वेळ आता सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत असणार आहे. कोरोना काळात सोशल डिस्टन्स राखण्यात यावे, यासाठी ही वेळ वाढविण्यात आली आहे.

बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. त्याचबरोबर सौंदत्ती नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 23 आणि रायबाग पंचायतीच्या प्रभाग क्र. 9 साठी पोटनिवडणूक होणार आहे. ही निवडणूकही 3 सप्टेंबरलाच होणार आहेे. या तिनही निवडणुकीसाठी एका तासासाठी मतदानाची वेळ वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी मंगळवारी हा आदेश काढला.

अर्ज माघारीची प्रक्रिया आजपासून

बेळगाव : महापालिका निवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली असून अनेक प्रभागांत राष्ट्रीय पक्षांसह म. ए. समितीला बंडखोरी रोखण्याचे आव्हान आहे. अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया बुधवारपासून (दि. 25) गुरुवारपर्यंत (दि. 26) चालणार आहे. त्यामुळे नेत्यांचा कस लागणार आहे.

महापालिका निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत आहे. त्यामध्ये गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येऊ शकतो. अनेक प्रभागांत सर्वच राजकीय पक्षांसमोर बंडखोरीचे आव्हान आहे. त्यामुळे बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास लावणे, त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान असणार आहे. म. ए. समितीने प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याचे आव्हान केले आहे.

अर्ज माघारीची मुदत

अर्ज माघारीसाठी बुधवार (दि. 25) आणि गुरुवारी (दि. 26) सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत मुदत असणार आहे.

Back to top button