कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात | पुढारी

कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  खत विक्री परवाना देण्यासाठी 20 हजारांची लाच घेणारा कृषी अधिकारी योगेश अगडी हा रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात सापडला. एकूण 30 हजारांची मागणी करून आधी 10 हजार घेतले होते. उर्वरित 20 हजार देण्यापूर्वी खत विक्रीसाठी अर्ज केलेले मौनेश्‍वर कम्मार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. योगेशला रंगेहाथ पकडल्यानंतर एसीबीच्या अधिकार्‍यांनी त्याच्या कार्यालयाची झडती घेतली व त्यानंतर घरी जाऊनही तपासणी केली.

यावेळी कार्यालयात 44 हजार तर घरात 3 लाख 54 हजार अशी एकूण 3 लाख 98 हजारांची रोकड सापडली. बाबले गल्ली विठ्ठल रुक्मिणी रोड, अनगोळ येथे राहणारे मौनेश्‍वर कम्मार यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले. सिटी कंपोस्ट मार्केटिंग या नावाने कंपनी सुरू करून यासाठी आवश्यक असलेल्या परवान्यासाठी त्यांनी कृषी खात्याकडे ॉनलाईन अर्ज केला. यानंतरच्या प्रक्रियेसाठी व परवाना मंजुरीसाठी येथील सह कृषी संचालक कार्यालयातील कृषी अधिकारी योगेश अगडी याने 30 हजाराची लाच मागितली. यापैकी 10 हजार रूपये त्याने आधीच स्वीकारले होते. उर्वरित 20 हजाराची रक्कम घेऊन बुधवारी कम्मार यांनी कृषी कार्यालय गाठले. तत्पूर्वी त्यांनी याची तक्रार येथील एसीबीकडे केली होती.
एसीबीचे उत्तर विभागाचे जिल्हा पोलिस प्रमुख बी. एन. न्यामगौडर व उपअधीक्षक जे. एम. करूणाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचला व कृषी अधिकार्‍याला रंगेहाथ पकडले. एसीबीचे निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, निरंजन एम. पाटील व बेळगावातील एसीबीच्या अन्य सहकार्‍यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button