Online fraud : तुम्हाला द्यायला धोका, भामटे शोधताहेत मोका! | पुढारी

Online fraud : तुम्हाला द्यायला धोका, भामटे शोधताहेत मोका!

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ओटीपी, एटीएम कार्ड बंद, बँक खाते बंद असे फोन करून फसविण्याचे प्रकार आता जुने झाले आहेत. याच्याही पुढे जाऊन आता ऑनलाईन भविष्य सांगतो म्हणत फसवणारे भामटेही वाढत आहेत. एक दोन नव्हे तब्बल 60 ते 70 प्रकारे भामटे तुम्हाला ऑनलाईन फसवू शकतात. ज्याच्याशी आपली ओळखच नाही तो आपला फायदा का करेल? इतका विचार करून जरी आपण सावधानता बाळगली तर फसवण्याचे प्रमाण निश्‍चितच घटेल.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत पोलिस खात्याकडून वेळोवेळी जागृती केली जाते. संबंधित व्यक्ती कशी फसली? याची माहिती माध्यमांना देऊन त्याचे सविस्तर वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्धही होते. तरीही फसणार्‍यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. ऑनलाईन फसविणारे भामटे कोणत्याही स्वरूपाचा कॉल करून तुम्हाला जाळ्यात ओढतात. परंतु, समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून फसवण्यासाठीच हे जाळे टाकत आहे, याचे भान वेळीच आले तर फसवणूक टाळून होणारे आर्थिक नुकसान थांबवता येईल.

दररोज नवनवीन लृप्त्या
पूर्वी फक्त बँकेतून बोलतोय, तुमचे एटीएम बंद पडणार आहे, लवकर अपडेट करून घ्या, असे सांगूनच फसवत होते. परंतु, त्याद्वारे आता फसवणूक होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आल्यानंतर भामटे वेगवेगळ्या क्‍लृप्त्या करून फसवत आहेत. त्यांच्याकडून फसवण्याचे प्रकार मोजकेच नाहीत तर शेकडो प्रकारे ते फसवतात. त्यामुळेच तर मूल व्हावे म्हणून ऑनलाईन ओळख झालेल्या भामट्याला दोन महिलांनी चक्क 70 हजार रू. फोन-पे द्वारे ट्रान्स्फर
केले.

अतिलोभाचा परिणाम
कोणीही फुकट काही देत नाही आणि दिले तर त्याच्या बदल्यात आपल्याकडून काही तरी द्यावेच लागणार, हेच आजकाल प्रत्येकजण विसरून गेला आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. काही हजार रूपये भरल्यानंतर दहा लाखांची गाडी मिळणार, या भ्रमात राहून आपण भामट्याने सांगितलेल्या खात्यावर 10 ते 50 हजार रूपये भरतो. यानंतर फसलो म्हणून पोलिस ठाणे गाठतो. प्रत्येकाच्या अतिलोभीपणाचा फायदा हे भामटे उठवतात, याची जाण प्रत्येक आली तरच फसवणुकीचे प्रमाण कमी होणार आहे, असे पोलिस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

असा कॉल करून होते फसवणूक

तुमचे बँक खाते अथवा एटीएम, क्रेडिट/डेबीट कार्ड बंद होणार आहे
ओएलएक्सवरून स्वस्तात वस्तू, वाहन विकणे आहे
स्वस्त दरात कर्ज हवे आहे, आमच्याशी संपर्क साधा
फेसबुक खाते हॅक करत मित्रांकडून रक्कम मागणे
व्हिडिओ कॉलद्वारे मैत्री करून नग्न फोटो काढून ब्लॅकमेल करणे
ट्रेडिंग अ‍ॅपद्वारे खरेदीचे आमिष दाखवत खात्यावरील रक्कम लाटणे
बिझनेस फोन-पेचा वापर करून त्याद्वारे फसवणूक करणे
नवीन पेट्रोल पंप, टॉवर देणे आहे, त्यासाठी डिपॉझिट मागून फसवणे
तुम्ही वापरत असलेले अ‍ॅप बंद होणार आहे, असे सांगून फसवणूक करणे
मोठे बक्षीस लागल्याचे सांगत डिपॉझिट भरण्यास सांगून लुटणे
एनी डेस्क, क्विक सपोर्ट अ‍ॅपद्वारे तुमच्या फोन-पे गुगल-पे सह अन्य अ‍ॅपवरून रक्कम काढून घेणे
घर विकणे, भाड्याने देणे आहे, अशी जाहिरातबाजी करत मॅजिक ब्रिक्स अ‍ॅपद्वारे रक्कम लाटणे
कस्टमर केअरला केलेला क्रमांक हॅक करून परस्पर फसवणूक करणे

स्टमर केअर अन् कंपनी

ऑनलाईन मागवलेली एखादी वस्तू वेळेत आली नाही तर अनेकजण कस्टमर केअर क्रमांकावर संपर्क साधतात. अनेकदा हे क्रमांक ऑनलाईन भामट्यांनी हॅक केलेले असतात. त्यामुळे अशा क्रमांकावर संपर्क साधताना व वस्तूबाबतचा तपशील देताना सदरचा क्रमांक खरोखर त्या कंपनीचाच आहे का? याची खात्री करून घ्यायला हवी. अनेकदा मोठ्या कंपनीच्या नावे देखील एखादे अक्षर बदलून दुसरी बनावट कंपनीचे अ‍ॅप तयार केले जाते. त्यामुळे कंपनीचे नाव व्यवस्थित वाचून मगच त्या कंपनीशी ऑनलाईन व्यवहार करणे चांगले.

 

 

Back to top button