विरार; पुढारी वृत्तसेवा : Virar Murder : विरार पूर्वेच्या गांधी चौक परिसरात एका घर जावयाने आपल्या सासूवर धारधार शस्त्राने हल्ला करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुप्रिया गुरव (वय २८) असं मयत पत्नीचे नाव असून जगदीश गुरव असं आरोपी पतीचे नाव आहे. पत्नीची हत्या करून आरोपी पती फरार झाला आहे.
अधिक माहिती अशी की, गांधी चौक परिसरातील नरेंद्र माऊली इमारतीत हा आरोपी घरजावई बनून पत्नीच्या घरी राहत होता. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे त्याच्या सासुसोबत भांडण होत असायचे मात्र काल (दि. २६) रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपीचे दारूच्या नशेत गॅलरीत सुकायला टाकलेल्या कपड्यांवरून शेजाऱ्यांसोबत भांडण झाले होते. मात्र तेव्हा त्याच्याबाजूने भांडण्यासाठी घरातले कुणी आले नसल्याने आरोपीने घरात जाऊन भांडण केले.
या भांडणात झालेल्या वादात त्याने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला व आरडा ओरड करणाऱ्या सासुवरही त्याने वार केले. या घटनेनंतर घरजावई जगदीश फरार झाला.
या घटनेत जखमी पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. विरार पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सुप्रीया यांचा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी शवविच्छेदन अहवालासाठी पाठवून दिला.
आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.