शेवगाव तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी जनशक्ती मंचच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात जळालेळ्या खरीप पिकांची तहसीलदार यांना सस्नेह भेट देण्यात आली. या मागणीला दाद न दिल्यास प्रत्येक गावात शासकीय अधिकार्यास घेराव घालण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी यावेळी दिला.
गेल्या दोन महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकर्यांचे खरीप पीक निसर्गाने हिरावून घेतले आहे. पावसाअभावी पिके जळण्याच्या मार्गाला लागल्याने शासनाने सरसकट नुकसान भरपाई जाहीर करून शेतकर्यांच्या खात्यात पैसे वर्ग करावेत, या मागणीसाठी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे व हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.5) तहसील कार्यालयावर शेतकर्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना जळालेली बाजरी, कपाशी, मूग, सोयाबीन पिकांची सस्नेह भेट देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी जगन्नाथ गावडे, कॉ.राम पोटफोडे, राजू पातकळ, अशोक पातकळ, गणेश धावणे, भाऊसाहेब फटांगरे, माणिक गर्जे, शेषराव फलके, पांडुरंग गरड, बाळासाहेब पाटेकर, रघुनाथ सातपुते, विनोद पवार, अण्णा काळे, आबासाहेब मोरे, राधाकिसन शिंदे, बाळासाहेब काकडे, डॉ.संतोष घनवट, आदिनाथ झिरपे, भाऊसाहेब पोटभरे, आसाराम शेळके, अशोक ढाकणे, अकबर शेख, सुनील दारकुंडे, रज्जाक शेख, वैभव पूरनाळे,विष्णू दिवटे, मनोज घनवट, भारत लांडे, भाऊसाहेब राजळे, रघुनाथ सातपुते, शिवाजी औटी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षदा काकडे म्हणाल्या, सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकर्यांनी पिकांसाठी खर्चाची पर्वा केली नाही. मात्र, ऐन पीक वाढीत असताना पावसाचा खंड पडल्याने सर्व पिके जळू लागली आहेत. पावसाअभावी तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्यांचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शासनाने ताबडतोब शेतकर्यांच्या सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, त्यांना अर्थसाह्य आणि जनावरांच्या दावणीवरच चारा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. मोर्चात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करून आंदोलकांना जनशक्तीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
शेतकर्यांच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा तालुक्यात एकाच दिवशी एकाच वेळी प्रत्येक गावामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचार्यांना घेराव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा हर्षदा काकडे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा