विष्णूनगर पोलीस : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून १३ वर्षांच्या मुलीची सुटका | पुढारी

विष्णूनगर पोलीस : अपहरणकर्त्यांच्या तावडीतून १३ वर्षांच्या मुलीची सुटका

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचारांची घटना ताजी असतानाच त्याच डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जवळीक साधत एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून संबंधित मुलीला सोडवून तिच्यास पालकाच्या ताब्यात सोपविले.

कोणताही धागादोरा हाती नसतानाही मोठ्या कौशल्याने या मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, पोलिसांनी यश मिळाले. अक्षय तुकाराम महाडिक (वय-२१) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण कोर्टाने त्याला अधिक चौकशीकरिता पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सोमवारी २० सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास विष्णूनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३६३, ३५४ सह लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याचे सन २०१२ चे कलम १२ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एका १३ वर्षीय मुलीला फूस लावून तिच्या पालकांच्या रखवालीतून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल होताच डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे, वपोनि पंढरीनाथ भालेराव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनानुसार मुलीचा शोध घेऊन तिला अपहरणकर्त्याच्या तावडीतून सोडवून आणण्याची जबाबदारी सपोनि गणेश वडणे यांच्या नेतृत्वाखाली फौजदार घनश्याम बेंद्रे, तुळशीराम लोखंडे आणि सचिन कांगुणे यांच्यावर टाकण्यात आली.

अवघ्या ४ जणांच्या पथकाने पथकाने मुलीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसताना तांत्रिक विश्लेषणासह खासगी गुप्तहेरांच्या साह्याने अक्षय महाडिक याला ठाण्यातून उचलले. चौकशीदरम्यान त्याने या मुलीला भिवंडीतील एका घरात कोंडून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी भिवंडीतील काल्हेर गावातल्या तेजस्विनी आर्केड इमारतीतल्या आरोपीच्या फ्लॅटमध्ये कोंडलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर या मुलीला तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी सांगितले.

यातील १३ वर्षीय तक्रारदार मुलीशी आरोपीची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. त्यातून या मुलीशी जवळीक साधल्यानंतर आरोपीने तिला फूस लावून पळवून नेले. आरोपी अक्षय महाडिक हा सीसीटीव्ही सिस्टीम, कॉम्प्युटरमध्ये एक्सपर्ट असल्याने तो सोशल मिडियामाध्यमांमध्येही तरबेज आहे. त्यामुळेच त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलीशी जवळीक साधली होती, असे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वपोनि पंढरीनाथ भालेराव यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

पहा व्हिडीओ : चला सफर करूया भिवंडीच्या किल्ल्याची

Back to top button