पुणे : सॅक्सोफोन म्हणजे पाश्चिमात्य वाद्य....पण, याच वाद्यावर जॉर्ज बुक्स यांनी भारतीय संगीताचे सूर छेडताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला तर जोडीला पं. कृष्णमोहन भट यांच्या सतार वादनाने रसिकांच्या हृदयाची तार छेडली.
सॅक्सोफोन या वाद्याचे स्वर सवाईमध्ये पहिल्यांदाच निनादले अन् रसिकांनी सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. 71 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला तो जॉर्ज बुक्स यांच्या आणि पं. कृष्णमोहन भट यांच्या सतारच्या सहवादनाने. त्याचबरोबर खास आकर्षण ठरले ते युवा कलाकारांचे सादरीकरण. युवा गायक हृषीकेश बडवे यांच्या सुमधुर गायनाने अन् इंद्रायुध मजुमदार यांच्या सरोद वादनाने रसिकांची मने जिंकली. पद्मा देशपांडे यांच्या अनुभवी गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलात आर्य संगीत प्रसारक मंडळ आयोजित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांमुळे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात हृषीकेश बडवे यांच्या सुरेल गायनाने झाली. त्यांनी राग गावतीमध्ये विलंबित झुमरा तालात ‘खबर सब की’ ही रचना सादर केली. त्याला जोडून द्रुत त्रितालातील ‘शान ए ताजमहल’ ही बंदिश सादर करीत त्यांनी रसिकांना स्वरानंद दिला.
त्यानंतर श्रीकल्याण रागात रूपक तालातील ‘साहिब तुम करम करो’ आणि मध्यलय त्रितालातील ‘सावरिया अब तो हम तुम संग’ या दोन बंदिशी सादर केल्या. हृषीकेश यांनी सादर केलेल्या सर्व बंदिशी त्यांचे गुरू पं. विजय बक्षी यांच्या होत्या. रसिकांच्या आग््राहाखातर हृषीकेश यांनी ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद दमदारपणे पेश केले. त्यानंतर युवा सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांनी राग श्रीमध्ये आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करत, रागाचे जणू स्वरचित्र रेखाटले. सरोदचा धीरगंभीर नाद मंडपात भरून राहिला. त्यांनी राग मांजखमाजमधील उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांच्या दोन रचना पेश केल्या. द्रुत लयीतील या वादनात तबलावादक ईशान घोष यांच्यासह सवाल जवाब विलक्षण रंगले.
यानंतर महोत्सवाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांनी राग शामकल्याण सादर केला. ‘जियो मेरो लाल’ हा पारंपरिक ख्याल त्यांनी दमदारपणे पेश केला. त्रितालात निबद्ध ‘रघुनंदन खेलत’ ही स्वरचित बंदिशही त्यांनी सादर केली.सोहनीबहार रागातील ‘नाथ देहो मोहें’ ही एकतालातील बंदिश त्यांनी ऐकवली. संगीत स्वयंवर या नाटकातील ‘करीन यदुमनी सदना’ या नाट्यपदाने त्यांनी विराम घेतला.
ज्येष्ठ सॅक्सोफोनवादक जॉर्ज बुक्स आणि सतारवादक पं. कृष्ण मोहन भट या कलाकारांचे सॅक्सोफोन आणि सतार सहवादन हा आजच्या महोत्सवाचा एक अप्रतिम स्वरानुभव ठरला. राग चारुकेशीच्या माध्यमातून या दोन्ही सिद्धहस्त कलाकारांनी आपापल्या वाद्यांवरील प्रभुत्व, वाद्यांच्या सौंदर्य निर्मितीच्या विविध शक्यतांचा स्वरपट रूपक तालाच्या साथीने उलगडत नेला. सतारीचे नाजुक झंकार सॅक्सोफोनच्या गंभीर नादाशी एकरूप होऊन गेले होते.
मी मराठीच संवाद साधतो, हे जॉर्ज बुक्स यांनी म्हणताच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सवाईमध्ये सादरीकरण करण्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. आमची 40-45 वर्षांपासूनची मैत्री आहे. पंडित कृष्णमोहन भट यांनीच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली. त्यांच्यासोबत राहूनच मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांना ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव आहे. सतार हे वाद्यच विलक्षण आहे, असेही त्यांनी सांगितले.
विधी महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेणारी मुग्धा कोंडे ही पहिल्यांदाच सवाईला आली आहे. तिला स्केचिंगची आवड असल्याने तिने मैफल चालू असतानाच युवा गायक हृषीकेश बडवे आणि सरोदवादक इंद्रायुध मजुमदार यांचे लाइव्ह चित्र रेखाटले. हे चित्र दाखविण्यात आल्यानंतर रसिकांनी तिचे खूप कौतुक केले.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी आज हयात नसले तरी एका रसिकाने पं. भीमसेन जोशी यांनाच पोस्टकार्डवर पत्र लिहिले. आनंद साठे असे त्यांचे नाव. त्यांचे पत्र स्वरमंडपात वाचून दाखविण्यात आले. ते पत्रात म्हणतात, प्रिय भीमसेनजी, या महोत्सवाचं हे 71 वं वर्ष आणि माझं या मैफिलीत श्रोता म्हणून सहभागी व्हायचं 43वं वर्ष. दरवर्षी एवढा मोठा संगीताचा सोहळा सातत्याने आयोजित करणं काही सोपं काम नाही. मला आज हे तुम्हाला जरूर सांगायला आवडेल की, तुमच्या नंतर तुमची पुढची पिढीसुद्धा तितक्याच आत्मीयतेने हे काम करतीये. आज इथे ठेवलेली ही पत्रपेटी तुमच्यापर्यंत पोहचायचं साधन वाटली. मला आणि न राहावून लिहिता झालो. काळाबरोबर पुढे आलेले, तरी आपली सांगीतिक परंपरा जपणारं महोत्सवाचं स्वरूप पाहायला तुम्ही असायला हवं होतं. बाकी संगीत रूपानं तुम्ही इथे जाणवताच!
सायंकाळी 4 ते रात्री 10)
सत्येंद्र सोलंकी - संतूरवादन
श्रीनिवास जोशी - गायन
उस्ताद शुजात हुसेन खान - सतारवादन
डॉ. अश्विनी भिडे - गायन