

पुणे : आपत्कालीन वैद्यकीय सेवेची 108 रुग्णवाहिका राज्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी ठरत आहे. सलग 11 वर्षांपासून आरोग्य संजीवनी ठरलेल्या या सेवेमुळे 1 कोटी 14 लाख 47 हजार 296 रुग्णांना मोफत सेवा देण्यात यश आले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि भारत विकास समूह (बीव्हीजी इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा राज्यात अव्याहतपणे सुरू आहे.
सध्या राज्यात एकूण 937 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) प्रकारातील रुग्णवाहिकांचा समावेश आहे. रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, वैद्यकीय ऑक्सिजन यंत्रणा आदी सुविधांचा समावेश आहे. देशातील 24 तास डॉक्टर आणि अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणारी ही एकमेव सेवा आहे.
राज्यात 5 डिसेंबरपर्यंत अपघाती घटनांमध्ये 108 रुग्णवाहिकेतून 5,44,224 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले. त्याचबरोबर आगीच्या घटनांतील 31,927, हृदयरोगातील 1,03,889, उंचावरून पडून जखमी झालेल्या 1,59,551, विषबाधेच्या 2,67,474, प्रसूतीवेळीच्या 17,96,655 आणि शॉक/वीज पडून जखमी झालेल्या 7,399 रुग्णांना सेवा देण्यात आली. विदर्भातील गोंडवाना विभागात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि अमरावती हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. या विभागातील 1 लाख 38 हजार 665 नागरिकांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे.
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेची 108 रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णवाहिकेत 41,516 बालकांचा जन्म झाला आहे. तसेच 17 लाख 95 हजार 292 गर्भवती महिलांना यशस्वी सेवा देण्यात आली आहे. थोडक्यात, 108 रुग्णवाहिका सर्वसामान्य नागरिकांसाठी अमृतवाहिनी ठरत आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सर्पदंश झालेल्या 1 लाख 19 हजार 824 नागरिकांनी 108 रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. यात ग््राामीण भागातील बहुतेक शेतकरीवर्गाचा समावेश आहे.